विचारमंथनाच्या ‘पिचवर’ बीसीसीआय!
By Admin | Published: July 16, 2015 02:24 AM2015-07-16T02:24:58+5:302015-07-16T08:45:34+5:30
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवरील बंदीच्या झटक्यातून सावरण्यासाठी बीसीसीआय आगामी आयपीएल सत्रासाठी विचारमंथनाच्या ‘पिचवर’ उतरली आहे.
नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवरील बंदीच्या झटक्यातून सावरण्यासाठी बीसीसीआय आगामी आयपीएल सत्रासाठी विचारमंथनाच्या ‘पिचवर’ उतरली आहे. संघटनेतील मोठे अधिकारी आता ही स्पर्धा ८ संघांसह खेळविण्यासाठी आपत्कालीन योजनेचा शोध घेत आहेत. आयपीएल संचालन परिषदेची रविवारी बैठक होईल. त्यापूर्वी बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी औपचारिक चर्चेला सुरुवात केली आहे. (वृत्तसंस्था)
शुक्ला भेटले दालमियांना
कोलकाता : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघ जरी निलंबित झाले असले तरी संकटात सापडलेली इंडियन प्रिमियर लीग पुढिल वर्षी होईल. असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
...तर धोनीसह इतरांवर बोली
जर बीसीसीआयने नव्या संघांसाठी बोली आमंत्रित केली, तर चेन्नईसह राजस्थान रॉयल्समधील सर्व खेळाडूंना लिलावाचा ‘सामना’ करावा लागेल. या सर्व खेळाडूंवर नव्याने बोली लागेल. यामध्ये स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रविचंद्रन आश्विन, ड्वेन ब्राव्हो, फाफ डुप्लेसिस, शेन वॉटसन, स्टीव्ह स्मिथ, जेम्स फॉकनर, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, मायकल हसी आणि आशिष नेहरा यांचा समावेश असेल. खेळाडूंच्या लिलावाची नवी प्रक्रिया २०१७च्या आयपीएलपूर्वी होणार होती. मात्र, वर्तमान परिस्थितीमुळे बीसीसीआयला नियोजित कार्यक्रमात बदल करून पहिल्यांदाच लिलावाची प्रक्रिया करावी लागेल.
आयपीएलची स्पर्धा ही आठ संघांचा समावेश असलेलीच व्हावी, यावर बीसीसीआय इच्छुक आहे. कारण, प्रसारक मल्टिस्क्रीन मीडिया यांच्यासोबत त्यांचा ६० सामन्यांचा करार आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून अधिक विचार केला जाईल. तसेच, बीसीसीआय दोन संघांना दोन वर्षांपर्यंत चालवू शकते. बंदीचा कालावधी संपल्यानंतर दोन्ही संघ पुनरागमन करू शकतात. नाही तर, दोन नव्या संघांचा शोध घेऊन खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्याचा पर्यायसुद्धा बीसीसीआयकडे आहे. कारण, कॉर्पाेरेटने आयपीएल संघ खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.