भारताचा चीनला मोठा दणका! गलवान खोऱ्यातील कुरापतींनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:31 PM2022-02-03T18:31:40+5:302022-02-03T18:55:15+5:30
चिनी आक्रमणाशी लढताना २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते.
नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध काहीसे तणावपूर्ण आहेत. चीनने अनेकदा भारताच्या काही भूभागांवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळोवेळी भारतीय सैन्याने त्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. काही महिन्यांपूर्वी चिनी आणि भारतीय जवानांमध्ये गलवान खोऱ्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता भारताने चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठा दणका दिला आहे. बीजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympics) स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर भारतीय डिप्लोमॅट्सने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
China has politicised Winter Olympics, charge d'affaires in Beijing not to attend opening, closing ceremonies, says India
— ANI Digital (@ani_digital) February 3, 2022
Read @ANI Story | https://t.co/IBQlHbwCCC#WinterOlympics#Indiapic.twitter.com/3nzxJZI45g
चीनने २०२० मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याविरुद्ध लढलेल्या एका सैनिकाला मानाची मशाल पकडण्याचा बहुमान दिला. गलवान खोऱ्यात चिनी जवानांचा मुकाबला करताना भारताचे २० जवान शहीद झाले होते. अशा वेळी हिवाळी ऑलिम्पिकमध्ये गलवान खोऱ्यात लढलेल्या सैनिकाला हा मान देणं हे अयोग्य असून काही अंशी भारताचा चिथावण्याचा प्रयत्न असल्याचं मान जात आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने आज डिप्लोमॅट्सबद्दलचा निर्णय जाहीर करताना चीनच्या या खेळीची निंदा केली. महत्त्वाची बाब म्हणजे, चीनकडे यजमानपद असताना भारतीय डिप्लोमॅट्स महत्त्वाच्या दोन्ही समारंभांना हजर नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचे पडसाद उमटतील असे मत काही जाणकार व्यक्त करत आहेत.
"चीनने त्या सैनिकाला हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील बहुमान दिला असल्याच्या बातम्या आम्ही ऐकल्या आणि वाचल्या. चीनची ही खेळी खूपच खेदजनक आहे. हिवाळी ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धांना त्यांनी राजकीय रंग देणं योग्य नाही. त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय डिप्लोमॅट्स बीजिंगच्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत" असा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला.