Vinesh Phogat Big Breaking : धक्कादायक! विनेश फोगाटला ऑलिम्पिकने अपात्र घोषित केले; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 12:12 PM2024-08-07T12:12:15+5:302024-08-07T12:16:14+5:30
Vinesh Phogat disqualified Olympics 2024 News: विनेशला भारताची पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू बनण्याची संधी मिळाली होती.
पॅरिस ऑलिम्पिकमधून मोठी धक्कादायक बातमी येत आहे. विनेशने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतू ती ५० किलोच्या गटात बसत नसल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. (Vinesh Phogat disqualified)
Vinesh Phogat: विनेश फोगाटचे किती ग्रॅम वजन जास्त भरले, आता अपिलही नाही, पदकही नाही
विनेशला भारताची पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू बनण्याची संधी मिळाली होती. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्याने भारतीयांना धक्का बसला आहे. विनेशचे वजन ५० किलोपेक्षा जास्त भरत आहे. रात्रभर तिचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र तरीही आज सकाळी तिचे वजन ५० किलो पेक्षा जास्त भरले. यामुळे विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले आहे.
महिला कुस्ती 50 किलो गटातून विनेश फोगटच्या अपात्रतेची बातमी भारतीय संघाने शेअर करणे खेदजनक आहे, असे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने म्हटले आहे. भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करत आहे. तसेच तिच्यावर कोणतीही टीका केली जाऊ नये. यापुढे यावर काहीही बोलले जाणार नाही. आम्हाला अन्य खेळांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे.
ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली होती. आज फायनल होती. विनेशनं पहिल्यांदाच कुस्तीत ५० किलो वजनी गटात आव्हान दिलं होतं. त्याआधी ती ५३ किलो वजनी गटात खेळत होती.
कॉमनवेल्थमध्ये ३ गोल्ड मेडलची मानकरी
विनेश फोगाटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग ३ गोल्ड मेडल जिंकले होते. २०१४ ग्लास्गो, २०१८ कोस्ट आणि २०२२ बर्मिंघम येथील स्पर्धेत गोल्ड पदक जिंकले होते. त्याशिवाय विनेशनं २०१८ मध्ये जकार्ता येथील एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर नाव कोरलं होतं. एशियन चॅम्पियनशिप २०२१ मध्येही विनेश फोगाटनं गोल्ड जिंकत सुवर्ण कामगिरी केली. त्याशिवाय एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने ३ सिल्व्हर मेडलही जिंकले आहे.