आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये या भारतीय खेळाडूची मोठी झेप
By Admin | Published: March 30, 2017 05:02 PM2017-03-30T17:02:08+5:302017-03-30T17:02:08+5:30
ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिळालेल्या मालिका विजयाचा भारतीय संघाला आणि संघातील खेळाडूंना चांगलाच फायदा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिळालेल्या मालिका विजयाचा भारतीय संघाला आणि संघातील खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. भारताचा कसोटी क्रिकेटमधील सलामीचा फलंदाज लोकेश राहुलने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये मोठी झेप घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत राहुलने दमदार प्रदर्शन केलं होतं. धरमशालामध्ये झालेल्या शेवटच्या कसोटीच्या दोन्ही डावात राहुलने अर्धशतक झळकावलं होतं. या खेळीच्या बळावर राहुल फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीमध्ये 11 व्या नंबरवर पोहोचला आहे. कर्नाटकचा हा खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका सुरू होण्याआधी 57 व्या क्रमांकावर होता. मालिकेतील दमदार प्रदर्शनाच्या बळावर त्याने 46 क्रमांकांनी झेप घेतली आहे. या सोबतच राहुल आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे तर न्यूझिलंडचा कॅप्टन केन विल्यम्सन दुस-या नंबरवर आहे.
कसोटी क्रमवारीत चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर तर विराट कोहली पाचव्या नंबरवर आला आहे. याखेरीज अजिंक्य रहाणे 14 व्या आणि मुरली विजय 34 व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन दोघंही संयुक्तरीत्या अव्वल स्थानावर कायम आहेत. तर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चांगल्या प्रदर्शनचा फायदा जलदगती गोलंदाज उमेश यादवला झाला आहे. पाच क्रमांकांनी झेप घेऊन उमेश 21 व्या नंबरवर आला आहे.
कसोटी अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे तर आर अश्विनला मागे टाकत रविंद्र जडेजा दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे.