बडे पंटर, अंगाडिया, हवाला आॅपरेटर रडारवर
By admin | Published: February 14, 2015 12:22 AM2015-02-14T00:22:40+5:302015-02-14T00:22:40+5:30
विश्वकपच्या पार्श्वभूमीवर बेटिंग रॅकेटमधल्या छोठ्या-मोठया बुकींसोबत बडे पंटर, ठरावीक हवाला आॅपरेटर आणि अंगाडिया मुंबई गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.
जयेश शिरसाट, मुंबई
विश्वकपच्या पार्श्वभूमीवर बेटिंग रॅकेटमधल्या छोठ्या-मोठया बुकींसोबत बडे पंटर, ठरावीक हवाला आॅपरेटर आणि अंगाडिया मुंबई गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. अंडरग्राऊंड झालेल्या बुकींचा शोध घेण्यासाठी पंटर, अंगाडियांचे नाक दाबले जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
वेगवेगळ्या नावाने बुक (सट्टाबाजार) चालविणारे बहुतांश बुकी पोलिसांच्या भीतीने अंडरग्राऊंड झाले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यांत मिळणारे मोबाईल नेटवर्क, डीशच्या मदतीने दिसणारे विश्वकपचे लाईव्ह प्रक्षेपण यामुळे बडे बुकी काही दिवसांपूर्वीच मुंबईतून गायब झाले आहेत. महाराष्ट्राच्या सीमेवर, आपापल्या गावी किंवा अन्य राज्यांमध्ये सुरक्षित ठिकाणी अड्डा जमवून ते विश्वकपच्या संपूर्ण हंगामात हजारो कोटींचा सट्टा स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. विश्वकपच्या प्रत्येक बॉलवर लागणारा कोट्यवधींचा ‘सौदा’, एका बुकीकडून दुसऱ्या बुकींकडे किंवा अखेरीस ‘बेट फेअर’सारख्या परदेशी कंपन्यांकडे होणारे कोट्यवधींचे ‘कटिंग’, हार-जीतचे ‘अकौंट सेटल’ हा सर्व व्यवहार मोबाईल फोनवर होतो. त्यामुळे बुकी बाहेर गेले तरी मोबाईलच्या माध्यमातून विश्वकपवरचा सट्टाबाजार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहील आणि मुंबईतले पंटर त्यावर कोट्यवधी उधळणार आहेत. या अंडरग्राऊंड झालेल्या बुकींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने नियमितपणे सट्टा लावणारे बडे पंटर रडारवर घेतले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे पंटर बुकींच्या संपर्कात येताच त्यांच्यामागे चौकशी, कारवाईचा ससेमिरा लागणार आहे. चौकशीतून बुकी आणि त्यांचे बुक याबाबतची महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेला मिळू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिंकलेली रक्कम पंटरांना देण्यासाठी किंवा हरलेली वसूल करण्यासाठी बुकींनी एजंट नेमले आहेत. त्यामुळे सट्टा मुंबईबाहेर लागला तरी त्याचा हिशेब इथेच होणार आहे. पंटरांनी जिंकलेली रक्कम चुकती करण्यासाठी बुकी हवाला आॅपरेटरची मदत घेतात. तर पंटरांकडून केलेली वसुलीही याच हवाला आॅपरेटरच्या माध्यमातून स्वत:पर्यंत मागवून घेतात. अशाच व्यवहारांसाठी शहरातले काही अंगाडियाही बुकींच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. क्रिकेट हंगामाआधी बुकी या अंगाडियांकडे मोठी रक्कम आगाऊ पोहोच करतात आणि त्यातून थोडी थोडी खर्च करतात. या प्रचलित पद्धतीमुळे ठरावीक हवाला आॅपरेटर आणि अंगाडियांच्या हालचालींवर गुन्हे शाखा करडी नजर ठेवून आहे.