‘बिग थ्री’ची सत्ता संपुष्टात येणार
By Admin | Published: February 5, 2016 03:30 AM2016-02-05T03:30:30+5:302016-02-05T03:30:30+5:30
भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या क्रिकेट जगतातील तीन महासत्तांना आणखी बलशाली बनविणासाठी करण्यात आलेले संवैधानिक बदल रद्द करण्यात येणार आहेत
दुबई : भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या क्रिकेट जगतातील तीन महासत्तांना आणखी बलशाली बनविणासाठी करण्यात आलेले संवैधानिक बदल रद्द करण्यात येणार आहेत. शशांक मनोहर यांच्या नेतृत्त्वाखालील बोर्डाने आयसीसीच्या सत्तेच्या चौकटीमध्ये आज अमुलाग्र बदल करण्याची सूचना केली आहे. आयसीसीने मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षीच्या पहिल्याच बैठकीत माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या कार्यकाळात अस्तित्त्वात आलेली पद्धत बदलण्याची गरज असल्याचे मान्य केले. या नवीन कायद्यामुळे भारत, इंग्लंड व आॅस्ट्रेलिया या बिग थ्रीला आयसीसीच्या नफ्यातील मोठा वाटा मिळत होता. मनोहर यांनी ही असमता मिटवून टाकण्यासाठी कंबर कसली आहे. अध्यक्ष निवडीबाबत नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचे आयसीसीने ठरविले आहे. एका निवेदनाद्वारे आयसीसीने म्हटले आहे की, जून २0१६ पासून अध्यक्षपदाचा कार्यकाल दोन वर्षाचा करण्यात यावा, असे प्रस्ताव पूर्ण परिषदेपुढे ठेवण्यास बोर्डाने एकमुखाने संमती दर्शविली.
यासाठी गुप्त मतदान प्रक्रिया राबविली जाईल. आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आपल्या बोर्डाचे विद्यमान अथवा माजी संचालक असण्याबरोबरच त्यांना कमीत कमी दोन पूर्णकालिन देशांच्या प्रतिनिधींचे अनुमोदन मिळायला हवे. (वृत्तसंस्था)