बिंद्रा पाचव्यांदा, तर नारंग, योगेश्वर चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणार

By admin | Published: July 20, 2016 04:55 AM2016-07-20T04:55:37+5:302016-07-20T04:55:37+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा ध्वजवाहक असलेला नेमबाज अभिनव बिंद्रा रिओमध्ये कारकिर्दीतील पाचव्या आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार

Bindra will be represented for the fifth time, whereas Narang and Yogeshwar will be represented for the fourth time | बिंद्रा पाचव्यांदा, तर नारंग, योगेश्वर चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणार

बिंद्रा पाचव्यांदा, तर नारंग, योगेश्वर चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणार

Next


नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा ध्वजवाहक असलेला नेमबाज अभिनव बिंद्रा रिओमध्ये कारकिर्दीतील पाचव्या आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे, तर लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकविजेता नेमबाज गगन नारंग आणि मल्ल योगेश्वर दत्त चौथ्यांदा आॅलिम्पिक खेळणार आहेत. महान टेनिसपटू लिएंडर पेस कारकिर्दीतील विक्रमी सातव्यांदा आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे.
नारंगसह योगेश्वर आणि थाळीफेकपटू विकास गौडा कारकिर्दीतील चौथ्या आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. विकास खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे, पण भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ अखेरच्या क्षणापर्यंत त्याच्या फिटनेसची प्रतीक्षा करणार आहे.
चार वर्षांपूर्वी लंडनमध्ये कांस्यपदक पटकावणारा नारंग रिओमध्ये तीन स्पर्धांमध्ये (१० मीटर एअररायफल, ५० मीटर रायफल थ्री पोझिशन आणि ५० मीटर रायफल प्रोन) सहभागी होणार आहे. योगेश्वर ६५ किलो वजनगटात फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. योगेश्वरने लंडनमध्ये कांस्यपदक पटकावले होते आणि रिओमध्येही त्याच्याकडून पदकाची आशा आहे.
लंडनमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली बॅडमिंटनस्टार सायना नेहवाल आणि महिला तिरंदाज बोम्बायलादेवी कारकिर्दीत तिसऱ्यांदा आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. सायना महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे, तर बोम्बायलादेवी वैयक्तिक व सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी इव्हेंटमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे.
स्टार तिरंदाज दीपिकाकुमारी, नेमबाज हीना सिद्धू, बॅडमिंटन दुहेरीतील जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा आणि बॉक्सर शिवा थापा वैयक्तिक दुसऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दीपिका वैयक्तिक व सांघिक रिकर्व्ह स्पर्धेत सहभागी होईल. हीना सिद्धू १० मीटर एअर पिस्तुल व २५ मीटर स्पोर्टस् पिस्तुल स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे. ज्वाला-अश्विनी दुहेरीमध्ये सहभागी होतील. शिव थापा बॉक्सिंगच्या ५६ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रिओ आॅलिम्पिकमध्ये अनेक खेळाडू पदार्पणाची स्पर्धा खेळणार आहेत. त्यात नेमबाजीमध्ये जीतू राय, अपूर्वी चंदेला, अयोनिका पाल, चैन सिंग, गुरप्रीत सिंग, प्रकाश नंजप्पा आणि किनन चेनाई, तिरंदाज लक्ष्मीराणी मांझी, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि संदीप कुमार (चालण्याची शर्यत) यांचा समावेश आहे.
भारतातर्फे पदकाची आशा असलेला जीतू राय दोन इव्हेंटमध्ये (१० मीटर एअर पिस्तुल आणि ५० मीटर फ्री पिस्तुल) सहभागी होणार आहे. अपूर्वी चंदीला (१० मीटर रायफल), अयोनिका पाल (१० मीटर एअर रायफल), चैन सिंग (५० मीटर रायफल थ्री पोझिशन), गुरप्रीत (१० मीटर एअर रायफल व ५० मीटर रॅपिड फायर पिस्तुल), चेनाई (ट्रॅप) आणि नंजप्पा (५० मीटर फ्री पिस्तुल) स्पर्धेत सहभागी होणार आहेत. लक्ष्मीराणी मांझी वैयक्तिक व टीम रिकर्व्ह इव्हेंटमध्ये, सिंधू बॅडमिंटन एकेरीत आणि संदीप कुमार ५० किलोमीटर पायी चालण्याच्या शर्यतीत सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Bindra will be represented for the fifth time, whereas Narang and Yogeshwar will be represented for the fourth time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.