बिन्नीची ७८ धावांची खेळी
By admin | Published: July 14, 2014 05:23 AM2014-07-14T05:23:53+5:302014-07-14T05:23:53+5:30
पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीची (७८ धावा, ११४ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) झुंजार अर्धशतकी
नॉटिंघम : पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीची (७८ धावा, ११४ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) झुंजार अर्धशतकी खेळी व त्याने रवींद्र जडेजा (३१) व भुवनेश्वर कुमार (नाबाद ५०) यांच्यासोबत केलेल्या उपयुक्त भागीदारीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज पाचव्या व अखेरच्या दिवशी चहापानापर्यंत दुसऱ्या डावात ८ बाद ३६७ धावांची मजल मारली. भारताकडे दुसऱ्या डावात ३०८ धावांची आघाडी असून २ विकेट शिल्लक आहेत. आज चहापानाला खेळ थांबला त्यावेळी ३१ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या भुवनेश्वर कुमारला ईशांत शर्मा (५) साथ देत होता.
भारताच्या पहिल्या डावातील ४५७ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडने पहिल्या डावात ४९६ धावांची मजल मारली. पहिल्या डावात ३९ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारताची दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉडच्या माऱ्यापुढे आज पाचव्या दिवशी सुरुवातीला ६ बाद १८४ अशी अवस्था झाली होती. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीने संघर्षपूर्ण फलंदाजी करीत भारताला सावरले. बिन्नी व जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. या भागीदारीमुळे इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकचे निर्णायक विजय मिळवीत मालिकेत आघाडी घेण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले जाणार आहे. केवळ अखेरच्या सत्राचा खेळ शिल्लक असल्यामुळे कसोटी अनिर्णीत राहणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याआधी, स्टुअर्ट ब्रॉडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी आज पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवताना भारताच्या मधल्या फळीला धक्के दिले. ब्रॉडने कालचे नाबाद फलंदाज विराट कोहली (०८) आणि अजिंक्य रहाणे (२४) यांना एकापाठोपाठ माघारी परतवले आणि रंगत निर्माण केली. त्यानंतर रवींद्र जडेजाने संयमी खेळी करीत उपाहारापर्यंत भारताला दुसऱ्या डावात ६ बाद २३० धावांनी सन्मानजनक मजल मारून दिली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी लियाम प्लंकेटचे लक्ष्य ठरला. जडेजाने (३१) खाते उघडण्यासाठी ३८ चेंडूंची प्रतीक्षा केली. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीने संघर्षपूर्ण खेळी करीत जडेजाला योग्य साथ दिली. जडेजा व बिन्नी यांनी सातव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करीत भारताचा डाव सावरला. जडेजा माघारी परतल्यानंतर बिन्नीने भुवनेश्वर कुमारच्या साथीने आठव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. बिन्नीला मोईन अलीने माघारी परतवले.