Brij Bhushan Sharan Singh: खासदारानं भर व्यासपीठावरच कुस्तीपटूला कानशिलात लगावली, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:53 PM2021-12-17T18:53:34+5:302021-12-17T20:08:57+5:30
Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रांचीच्या क्रीडाग्राममध्ये शहीद गणपत राय स्टेडियममध्ये सुरू असलेल्या अंडर-१५ राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बृजभूषण सिंह यांनी एका कुस्तीपटूच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.
बृजभूषण सिंह या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर येऊन स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा हट्ट करणाऱ्या एका कुस्तीपटूच्या वागणं काही बृजभूषण सिंह यांना पसंत पडलं नाही. त्यांनी संतापाच्या भरात संबंधित कुस्तीपटूला थोबडवलं. त्यानंतर कुस्तीपटू स्पर्धेत व्यासपीठावरुन निघून गेला.
कुस्तीची स्पर्धा वयवर्ष १५ वर्षाखालील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. पण एक स्पर्धक वयोमर्यादेत बसत नसतानाही स्पर्धेत सहभागी होण्याची गळ आयोजकांकडे घालत होता. इतकंच नव्हे, तर त्यानं थेट व्यासपीठावर चढून खासदार बृजभूषण यांच्याकडे तक्रार करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित कुस्ती स्पर्धक वाद घालण्यास सुरुवात करु लागल्यानंतर बृजभूषण यांच्याही संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी थेट कुस्तीपटूच्या थोबाडीत लगावली. त्यानंतर एकच गदारोळ उडाला. आयोजकांनी तातडीनं संबंधित स्पर्धेकाला मंचावरुन खाली उतरवलं. ६४ वर्षीय बृजभूषण शरण सिंह उत्तर प्रदेशच्या कैसरंज मतदार संघाचे भाजपाचे खासदार आहेत. याशिवाय याआधी त्यांनी गोंडा लोकसभा मतदार संघाचंही प्रतिनिधीत्व केलं आहे.