वानखेडेबाहेर ‘ब्लॅक गेम’
By admin | Published: March 31, 2016 03:13 AM2016-03-31T03:13:19+5:302016-03-31T03:13:19+5:30
सलामीला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा सर्वांनी जवळजवळ सोडल्या होत्या. मात्र यजमानांनी यानंतर फिनिक्सभरारी घेत उपांत्य
- महेश चेमटे, मुंबई
सलामीला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा सर्वांनी जवळजवळ सोडल्या होत्या. मात्र यजमानांनी यानंतर फिनिक्सभरारी घेत उपांत्य फेरी गाठलीच. विशेष म्हणजे भारतातील ‘क्रिकेटपंढरी’ मानल्या जात असलेल्या मुंबईत टीम इंडियाची लढत होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटप्रेमी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या सामन्यासाठी सुरू असलेल्या तिकिटांच्या काळ्याबाजारामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
टीम इंडियाची उपांत्य फेरी निश्चित होताच तिकीट मास्टर्सची वेगळीच खेळी सुरू झाली. वानखेडेवर होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी सांगेल ती किंमत मोजणार, याची पूर्ण कल्पना असलेल्या तिकीटमाफियांनी क्रिकेटप्रेमींना कोंडीत पकडून तिकिटांची किंमत अव्वाच्या सव्वा केली आहे. त्यामुळे सामन्याआधी दोन दिवसांपासूनच ब्लॅकने तिकीट विक्री करणाऱ्या टोळी वानखेडे स्टेडियमभोवती सक्रिय झाले आहेत. प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर क्रिकेटप्रमींना तिकीट उपलब्ध होत नाही. पण ब्लॅकने मात्र तिकीट मिळत आहे. मात्र त्यासाठी खिसा चांगलाच रिकामा करावा लागत आहे. ‘‘वानखेडेवर सामना असल्याने खूप उत्सुक आहे. रविवारपासून तिकिटांसाठी स्टेडियमबाहेर फेऱ्या मारतोय. पण तिकीट उपलब्ध नाहीत. पण ब्लॅकमध्ये सर्रास तिकिटांची विक्री होत आहे,’’ अशी प्रतिक्रिया एका क्रिकेटप्रमीने दिली, तर ‘‘कोहलीची फटकेबाजी प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी मी
जास्तीत जास्त सहा ते सात हजार रुपये मोजायला तयार आहे. पण १०
हजार खूप होतात,’’ अशी खंतही एकाने व्यक्त केली.
असा आहे ब्लॅक तिकिटांचा भाव...
मूळ किंमत ब्लॅक किंमत
सुनील गावसकर स्टँड एक हजार रुपये १३ हजार रुपये
नॉर्थ स्टँड दीड हजार रुपये१५ हजार रुपये
गरवारे स्टँड १० हजार रुपये३० हजार रुपये
तिकीटमाफिया आणि क्रिकेटप्रेमींतील संवाद
क्रिकेटप्रेमी : तिकीट मिलेगा क्या?
तिकीटमाफिया : हां... सुनील गावसकर स्टँड का मिलेगा, लेकिन १३ हजार लगेगा.
क्रिकेटप्रेमी : कुछ कम नहीं हो सकता?
तिकीटमाफिया : सस्ते में चाहिए तो घर पे बैठके टीव्ही पे मॅच का मजा ले.