‘ब्लास्टर’ची बरोबरी !

By Admin | Published: October 27, 2014 02:03 AM2014-10-27T02:03:23+5:302014-10-27T02:03:23+5:30

सलग दोन पराभवानंतर गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या केरळा ब्लास्टर संघाने आज, रविवारी येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर आश्चर्यकारक निकालाची नोंद केली

'Blaster' equals! | ‘ब्लास्टर’ची बरोबरी !

‘ब्लास्टर’ची बरोबरी !

googlenewsNext

कोलकाता : सलग दोन पराभवानंतर गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या केरळा ब्लास्टर संघाने आज, रविवारी येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर आश्चर्यकारक निकालाची नोंद केली. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या आणि एकही पराभव न पत्करणाऱ्या अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाला त्यांनी १-१ असे बरोबरीत रोखून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या बरोबरीमुळे ब्लास्टरने इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये आपले गुणांचे खाते उघडले.
विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानावर उतरलेल्या कोलकाताने घरच्या मैदानाचा फायदा उचलत सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. फिकरू लेमेसा याच्या अनुपस्थितीत उतरलेल्या कोलकाताच्या आक्रमणात त्रुटी आढळत होत्या. गोवा एफसी विरुद्धच्या लढतीत शिस्तभंग केल्यामुळे फिकरूवर ही कारवाई करण्यात आली. तसेच प्रशिक्षक
अंटोनियो लोपेझ यांच्यावर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या कोलकातासाठी केरळा संघाविरुद्धची ही लढत तितकिशी सोपी नव्हती. केरळाचा बचाव आणि आक्रमण दोन्ही दमदार असल्याने कोलकाताला घरच्या मैदानावरही चांगलीच मेहनत घ्यावी लागली. २०व्या मिनिटाला केरळाच्या राफेल रोमेय याने कोलकाताच्या जोफ्रेची जर्सी ओढून त्याला पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पंचांनी त्याला पिवळे कार्ड दाखविले. २२व्या मिनिटाला कोलकाताने गोल करून केरळाला हादरा दिला. बलजित साहनी याने बोर्जाचा पासवर गोल करून यजमानांना १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघांमधील आक्रमकता आणखीनच वाढली. २८व्या मिनिटाला जोफ्रेने केरळाच्या खेळाडूंना चकवत गोलपोस्टपासून ६ मीटर अंतरावर पोहोचला; परंतु त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला. ३५ व्या मिनिटाला जोफ्रे गोल करण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी केरळाच्या केड्रीच हेंगबर्ट याने अप्रतिम टॅकल करून त्याला रोखले. ४१व्या मिनिटाला केरळाला जल्लोष करण्याची संधी मिळाली. इयान ह्यूम याने चेंडूवर ताबा कायम राखत कोलकाताचा बचाव भेदून गोल केला आणि सामना १-१ असा बरोबरीत आला.
मध्यांतरानंतर कोलकाताने बिस्वजित सहायाच्या जागी जाकूब पोडनी याला एन्ट्री देत रणनीतीत बदल केला. ५३व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर जोफ्रेने चेंडू साहनीकडे टोलवला आणि तो चेंडू गोलपोस्टच्या बारला लागल्याने गोल करण्याची संधी हुकली. ६२व्या मिनिटाला साहनी याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. ६६व्या मिनिटाला केवीन लोबो याच्याऐवजी राकेश मसिह याला पाचारण करून कोलकाताने आक्रमण आणखी वाढवले. सामना जसजसा पुढे सरकत होता, तशी चुरस आणि ओढाताण आणखीन वाढत होती. त्याचा प्रत्यय ७३व्या मिनिटाला आला. केरळाच्या ह्यूमने कोलकाताच्या साहनी याला चुकीच्या पद्धतीने टॅकल करून पाडले आणि दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडले. पंचांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. पंचांनी ह्यूमला या कृत्याबद्दल पिवळे कार्ड दाखवून वॉर्निंग दिली. त्यानंतर सामन्यात चुरस पाहायला मिळाली नाही आणि ही लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Blaster' equals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.