बंदीविरुद्ध अखेरची लढाई लढणार ब्लॅटर
By admin | Published: August 25, 2016 04:25 AM2016-08-25T04:25:55+5:302016-08-25T04:25:55+5:30
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फीफा) नेतृत्व करणारे सॅप ब्लॅटर यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी सहा वर्षांची बंदी लावण्यात आली.
जिनेव्हा : अनेक दशके आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फीफा) नेतृत्व करणारे सॅप ब्लॅटर यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी सहा वर्षांची बंदी लावण्यात आली. या निर्णयास ब्लॅटर हे सर्वोच्च क्रीडा लवादापुढे (कोर्ट आॅफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टस् - कॅस) आव्हान देणार असून या निर्णायक लढाई लढण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
८० वर्षांचे ब्लॅटर यांनी ‘कॅस’पुढे अपील केले असून माझ्यावर लावलेली बंदी उठविण्यात येथील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जवळपास २० लाख डॉलरची रक्कम अवैधरीत्या हस्तांतरित केल्याचा ब्लॅटर यांच्यावर ठपका असून त्यांच्यासह युरोपियन फुटबॉलचे माजी प्रमुख मायकेल प्लाटिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर ही बंदी सहा वर्षे करण्यात आली.
ब्लॅटर पुढे म्हणाले, ‘कॅस याप्रकरणी माझी बाजू ऐकल्यानंतर २० लाख डॉलरचे हस्तांतरण किती चुकीच्या प्रकारे दाखविण्यात आले हे समजून घेईल’, अशी आशा ब्लॅटर यांनी व्यक्त केली. ‘फीफा समिती आणि शिस्तपालन समितीचा आमच्यावर विश्वास नाही पण कॅस पॅनल आमची बाजू समजून घेईल, असा विश्वास वाटतो.’ (वृत्तसंस्था)