युवीने घेतला मास्टर ब्लास्टरचा आशीर्वाद
By Admin | Published: May 9, 2016 10:52 PM2016-05-09T22:52:39+5:302016-05-09T22:52:39+5:30
भारताचा स्टार अष्टपैलू युवराज सिंगही यास अपवाद नसून सचिनप्रती असलेला आदर व्यक्त करताना तो थेट सचिनच्या पाया पडला.
विशाखापट्टणम : क्रिकेटवेड्या भारतामध्ये क्रिकेट हा खेळ नाही तर धर्म मानला जातो. तर, याचा सर्वस्व म्हणजे अर्थातच सचिन तेंडुलकर. आज प्रत्येक क्रिकेटपटू याच मास्टर ब्लास्टरला आपला आदर्श मानून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. विशेष म्हणजे सध्याच्या टीम इंडियामध्येही अनेक असे क्रिकेटपटू आहेत जे सचिनमुळेच या खेळाकडे वळले असून त्यालाच आपल्या यशाचे श्रेय देतात. भारताचा स्टार अष्टपैलू युवराज सिंगही यास अपवाद नसून सचिनप्रती असलेला आदर व्यक्त करताना तो थेट सचिनच्या पाया पडला.
नुकताच विशाखापट्टणम येथे झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान हा प्रसंग झाला. फलंदाजी करून मैदानाबाहेर जात असताना युवीने सचिनच्या पाया पडून त्याचे आभार मानले. विशेष म्हणजे या वेळी सचिनने युवीला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र युवीने सचिनचे काहीही न ऐकता आपल्या देवाला नमस्कार केलाच.
या प्रसंगाचा फोटो अल्पावधीतच सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. दखल घेण्याची बाब म्हणजे सचिनचा मुलगा अर्जुननेही या फोटोवर कमेंट करताना युवीचे आभार मानले. युवीने याआधीही २०१४ मध्ये लॉर्डस् मैदानावर झालेल्या विशेष सामन्यात एमसीसी एकादशचा कर्णधार असलेल्या सचिनच्या पाया पडून आशीर्वाद घेतले होते. तसेच विराट कोहलीने यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर सचिनला अभिवादन केले होते. (वृत्तसंस्था)