फटक्यांची आतिषबाजी! यंदाच्या आयपीएलमध्ये चौकार-षटकारांद्वारे फटकावल्या गेल्या दहा हजार धावा
By admin | Published: May 22, 2017 07:04 PM2017-05-22T19:04:26+5:302017-05-22T19:59:16+5:30
नेहमीप्रमाणे यंदाच्या हंगामातही आयपीएलच्या मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पडला
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढतीने आयपीएलच्या दहाव्या हंगामाची सांगता झाली. नेहमीप्रमाणे यंदाच्या हंगामातही आयपीएलच्या मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पडला. स्पर्धेच्या क्वालिफायर फेरीत जरी गोलंदाजांचा दबदबा दिसून आला असला तरी साखळी फेरीत फलंदाजांचा बोलबाला राहिला. यंदाच्या आयपीएलच्या हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 10 हजार 662 धावा चौकार-षटकारांद्वारे फटकावल्या गेल्या.
आयपीएल 10 मध्ये एकूण 60 सामने खेळवले गेले. त्यात सर्व 8 संघांनी मिळून 18 हजार 775 धावा बनवल्या. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या धावांपैकी निम्म्यांहून अधिक धावा या चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून वसूल करण्यात आल्या. यंदा फलंदाजांनी एकूण 705 षटकार तर 1608 चौकार लगावले. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामना क्र. 51 मध्ये फलंदाजांनी एकूण 62 वेळी चौकार आणि षटकारांच्या रुपात चेंडू सीमापार धाडला.
आयपीएल 10 मध्ये डेव्हिड वॉर्नर सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 641 धावा कुटत ऑरेंज कॅप पटकावली. तर 498 धावांसह कोलकाता नाइट राटडर्सचा कर्णधार गौतम गंभीर दुसऱ्या स्थानी राहिला. वॉर्नरने यंदाच्या हंगामात एक शतकी खेळीसुद्धा केली. तसेच एका डावात 126 धावांसह तो यंदाच्या हंगामात एका डावात सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाजही ठरला. तसेच आयपीएलमध्ये यंदा एकूण 5 शतके आणि 95 अर्धशतके फटकावली गेली.