Blog: १८ व्या वर्षी तो निघालाय जग जिंकायला! प्रज्ञाननंदा सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा
By स्वदेश घाणेकर | Published: August 22, 2023 11:37 AM2023-08-22T11:37:15+5:302023-08-22T11:57:23+5:30
Journey of R Praggnanandhaa - १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. FideWorldCup स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फॅबियानो कारूआनाचा ३ ५-२.५ असा पराभव केला.
- स्वदेश घाणेकर
Journey of R Praggnanandhaa - आजच्या पिढीतील १८ वर्षांची पोरं काय करतात? एक तर कुठल्या तरी नटाला आदर्श मानून फुकाची शायनिंग मारतात किंवा रिल्सच्या जाळ्यात अडकून पडलेली दिसतात... त्यात कोरोनाने त्यांना या सोशल मीडियाच्या अधिक जवळ आणले आणि भलेभले दिशा भरकटले... पण याच युवा पिढीतील एक सामान्य कुटुंबातील मुलगा असामान्य कार्य करतोय... आर प्रज्ञाननंदा असे या १८ वर्षीय मुलाचं नाव आहे..
साधं राहणीमान, दिसायलाही अगदी सामान्य...... पण मनात उंच झेप घेण्याची इच्छाशक्ती असलेला हा प्रज्ञाननंदा... आज त्याने जगाला भारतीयांचा हेवा वाटेल अशी कामगिरी केलीय.. अवघ्या १८ व्या वर्षी पठ्ठ्याने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली, तेही जागतिक क्रमवारीत तिसऱ्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिग्गजांना पराभूत करून... या स्पर्धेची फायनल गाठणारा तो विश्वनाथन आनंद यांच्यानंतर दुसरा भारतीय ठरला.. ( कदाचित सर्वात युवा भारतीय ) . आता त्याची गाठ मॅग्नस कार्लसन याच्याशी आहे...
कोरोनामुळे प्रज्ञाननंदच्या घोडदौडीला ब्रेक लागला होता, सुसाट पाळणारा त्याचा अश्वमेध संथ झालेला. पण प्रज्ञाननंदाने आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. वयाच्या १०व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर बनणारा तो जागतिक युवा बुद्धिबळपटू बनला.. २०१८ मध्ये १२ व्या वर्षी त्याने ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आणि जगातील दुसरा युवा खेळाडू ठरला. १४व्या वर्षी त्याने २६०० ELO रेटिंग कमावले आणि पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला..
बँकेत ब्रांच मॅनेजर वडील रमेशबाबू अन् आई नागालक्ष्मी गृहिणी... चेन्नईतील सामान्य कुटुंबातील प्रज्ञाननंदा... त्याची बहीण आर वैशाली ही महिला ग्रँडमास्टर आहे.. त्याने बहिणीसोबत जेव्हा बुद्धीबळ स्पर्धा जिंकली, तेव्हा चेन्नईतील आयोजकांनी पत्रकारांना हा मुलगा भविष्यातील स्टार आहे, यावर काही तरी स्टोरी करा असे सांगितले. डी.व्ही.सुंदर यांचे ते शब्द खरे ठरले. त्यावेळचा एक किस्सा असा की, त्याचं नाव उच्चारणं थोडं अवघडच आहे आणि त्यामुळे तुझ्या नावाचा नेमका उच्चार कसा होतो, असे त्याला विचारले गेले. त्याने लहानवयात ते न चुकता लिहून दाखवले अन् अभिमानाने सांगितले की, माझ्या नावात ५ A आहेत.. तेव्हा पत्रकार म्हणाले तू A class मुलगा आहे. त्यावर तो लगेच म्हणाला, नाही नाही. मी इयत्ता दुसरीत G Section मध्ये आहे.... असा हा प्रज्ञाननंदा साधाभोळा. तो त्याने आजही जपलाय..
घराबाहेर फार न फिरलेली त्याची आई ही प्रज्ञाननंदाची प्रेरणा आहे... तिचा साधेपणा प्रज्ञाननंदमध्ये जाणवतो... आई नागलक्ष्मी आज बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत प्रज्ञाननंदाचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित आहे... त्याची मॅच सुरू असताना एका कोपऱ्यात उभी राहून ती आपल्या मुलाची प्रगती डोळ्यांत साठवताना दिसतेय. आईसोबत सेल्फी घेण्यासाठी जगभरातील दिग्गज घोळका घालत आहेत... आपला मुलगा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या उंबरठ्यावर आहे याचा जराही माज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर नाही... सामान्य कुटुंबाची हीच ताकद आहे..
''मी आता दमलोय... या स्पर्धेत इथपर्यंत पोहचेन याचा विचार केला नव्हता. पण, आता फायनलला पोहोचल्यावर आनंद होतोय. या स्पर्धेत मॅग्नस याच्याविरुद्ध खेळेन याची अपेक्षा नव्हती, कारण त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी फायनलपर्यंत पोहोचणे हा एकमेव मार्ग होता आणि मी फायनलपर्यंत पोहोचेन याची मला अपेक्षा नव्हती. मी फायनलमध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन,''असे प्रांजळ मत प्रज्ञाननंदाने उपांत्य फेरीतील विजयानंतर व्यक्त केले.
असा हा सामान्य घरातील प्रज्ञाननंदा असामान्य कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय.