शरीरसौष्ठव स्पर्धा : पुण्याचा महेंद्र चव्हाण ‘अटल महाराष्ट्र श्री’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:14 AM2020-03-09T03:14:12+5:302020-03-09T03:14:28+5:30
अनिल बिलावाला उपविजेतेपद; महिलांमध्ये अमला ब्रह्मचारी, दीपाली ओगले अजिंक्य
सातारा : येथील तालीम संघाच्या मैदानावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने ‘अटल महाराष्ट्र श्री’चा किताब पटकविला, तर मुंबईच्या अनिल बिलावा याने उपविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसले. मुंबईच्या अमला ब्रह्मचारीने सलग दुसऱ्यांदा ‘मिस महाराष्ट्र’चा बहुमान पटकावला, तर महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात उपनगरची दीपाली ओगले ‘मिस महाराष्ट्र’ठरली.
शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पवार यांनी ‘महाराष्ट्र श्री’च्या माध्यमातून सातारकरांना शरीरसौष्ठवाची पीळदार मेजवानी दिली. दहा हजार क्रीडाप्रेमींच्या साक्षीने पुण्याच्या महेंद्र्र चव्हाण याने ‘महाराष्ट्र श्री’चा किताब जिंकला. विविध गटातून आलेल्या दहा विजेत्यांमध्ये ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’साठी सात पोझेस झाल्या.
मुंबईच्या अनिल बिलावाचे कडवे आव्हान मोडीत काढीत पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने १६ व्या ‘महाराष्ट्र श्री’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेवर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. त्याला रोख दीड लाख रुपये, चषक, प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत मुंबईने सांघिक विजेतेपद आणि उपविजेतेपदही पटकावले. पुरस्कार वितरण सोहळ्याला भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) हणमंतराव गायकवाड, जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांतराव आपटे आदी उपस्थित होते
महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या अमला ब्रह्मचारीचाच दबदबा राहिला. तिने शरीरसौष्ठव गटात सर्वोत्तम प्रदर्शन करताना ‘मिस महाराष्ट्र’चे जेतेपद कायम राखले. महिलांच्या फिजिक स्पोर्टस् प्रकारात मुंबई उपनगरच्या दीपाली ओगलेने बाजी मारली. रेणुका मुदलियारवर मात करीत दीपालीने जेतेपद पटकावले.
स्पर्धेचा निकाल (प्रथम तीन क्रमांक)
५५ किलो : अवधूत निगडे (कोल्हापूर), नीतेश कोळेकर (उपनगर), नितीन शिगवण (उपनगर)
६० किलो : नितीन म्हात्रे (प. ठाणे), देवचंद गावडे (मुंबई उपनगर), प्रीतेश गमरे (मुंबई उपनगर)
६५ किलो : दिनेश कांबळे (ठाणे), उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), फैयाज शेख (सातारा)
७० किलो : तौसिफ मोमीन, रोशन नाईक (पालघर), मनोज मोरे
७५किलो : सुदर्शन खेडेकर, सतीश यादव, महेश जाधव
८० किलो : अनिल बिलावा, भास्कर कांबळे, राजू भडाळे (पुणे)
८५ किलो : सुशील मुरकर (मुंबई), गणेश पेडामकर, हबीब सय्यद
९० किलो : रसल दिब्रिटो (मुंबई उपनगर), दीपक तांबीटकर (मुंबई), संदेश सावंत (सिंधुदुर्ग)
१०० किलो वजनी गट : महेंद्र्र चव्हाण (पुणे), अरुण नेवरेकर (मुंबई), विशाल पखाले (सातारा).
१०० किलोवरील : नीलेश दगडे (मुंबई उपनगर), अक्षय मोगरकर (ठाणे).