धोनीसारखेच ‘बोल्ड’ निर्णय घेईन : कोहली
By admin | Published: January 6, 2015 01:42 AM2015-01-06T01:42:00+5:302015-01-06T01:42:00+5:30
कठीण समयी न डगमगता ‘ बोल्ड’ निर्णय घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. याबाबतीत धोनीच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे प्रयत्न असतील, असे नवा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे.
सिडनी : कठीण समयी न डगमगता ‘ बोल्ड’ निर्णय घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. याबाबतीत धोनीच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे प्रयत्न असतील, असे नवा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे.
धोनीच्या निवृत्तीबद्दल कोहली म्हणाला, की मेलबोर्न कसोटीनंतर ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलून किट भरणे सुरू होते. त्याच वेळी धोनी आला आणि काही बोलायचे आहे, असे म्हणाला. त्याने लगेचच निर्णय सांगून टाकल्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले. काय होते आहे, हे कळण्याआधी त्याने निवृत्ती जाहीर केली. हा निर्णय आमच्या पायाखालची वाळू सरकविणारा ठरला. काय बोलावे हे सूचत नव्हते. धोनीसाठी हा भावुक क्षण होता. त्याच्या नेतृत्वात ज्या युवा खेळाडूंनी सुरुवात केली ते सर्व जण बुचकळ्यात पडले.
कोहलीने धोनीचे कौतुक करताना सांगितले, की धोनीकडून मला बरेच शिकायला मिळाले. विशेषत: कठीण समयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आली. मी धोनीसारखा धैर्यवान बनू इच्छितो. कुठलाही कर्णधार बाबी आत्मसात करायला मागे पुढे पाहणार नाही. धोनीला अंगठ्याची दुखापत झाल्याने कोहलीने पहिल्या कसोटीत काळजीवाहू कर्णधाराची भूमिका बजावली. आगामी कसोटीसाठी आमच्या भूमिकेत बदल करण्याची गरज आहे, असे वाटत नसल्याचे सांगून कोहली म्हणाला,की सकारात्मक खेळा आणि जिंका, असा माझा सल्ला राहील. माझे गोलंदाज २० बळी घेऊ शकतात. आम्ही सहकाऱ्यांवर विश्वास टाकायला हवा. मला माझ्या गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. (वृत्तसंस्था)