बोपन्नाची दुखापतीमुळे माघार
By admin | Published: September 11, 2016 12:39 AM2016-09-11T00:39:38+5:302016-09-11T00:39:38+5:30
स्पेनविरुद्ध डेव्हिस कप विश्वग्रुप प्ले आॅफ लढतीआधीच शनिवारी दुहेरीतील अव्वल खेळाडू रोहन बोपन्नाने गुडघेदुखीमुळे १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतून माघार
नवी दिल्ली : स्पेनविरुद्ध डेव्हिस कप विश्वग्रुप प्ले आॅफ लढतीआधीच शनिवारी दुहेरीतील अव्वल खेळाडू रोहन बोपन्नाने गुडघेदुखीमुळे १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतून माघार घेतल्याने भारतीय संघाला जोरदार धक्का बसला आहे.
बोपन्नाने अखिल भारतीय टेनिस महासंघाच्या (एआईटीए) निवड समिती अध्यक्षांना आपल्या गुडघ्याच्या दुखापतीविषयी कळवले होते आणि या लढतीतून माघार घेऊ देण्याची विनंती केली. समितीने बोपन्नाची विनंती मान्य केली आणि आता त्याच्या जागी युवा खेळाडू सुमित नागल याचा चार सदस्यीय भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
टेनिस महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, यूएस ओपनदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे बोपन्नाने निवड समितीला कळवले होते. बोपन्नाने निवड समितीला स्पेनविरुद्ध डेव्हिस कप विश्व प्लेआॅफ लढतीतून आपल्याला माघार घेऊ देण्याची विनंती केली आणि त्याची ही विनंती निवड समितीने मान्य केली. युवा खेळाडू सुमित नागल याचा चार सदस्यीय संघात समावेश करण्यात आला. संघातील तीन अन्य खेळाडू साकेत मिनेनी, रामकुमार रामनाथन आणि लिएंडर पेस हे असल्याचे एआयटीएने सांगितले. आता साकेत मिनेनी दोन्ही एकेरीचे आणि दुहेरीचे सामने खेळतो किंवा नागल याला एखाद्या सामन्यात खेळण्याची संधी मिळते हे पाहणे मनोरंजक असेल. जर निकाल भारताविरुद्ध असल्यास नागल याला परतीच्या एकेरीत खेळवले जाऊ शकते.
भारत २0११ नंतर प्रथमच विश्वग्रुपमध्ये पोहोचण्याच्या प्रयत्नात होता; परंतु दुहेरीतील तज्ज्ञ बोपन्नाने माघार घेतल्याने स्पर्धेच्या एक आठवड्याआधी जोरदार धक्का बसला. भारत आणि स्पेन यांच्यातील ही लढत येथील आर. के. खन्ना स्टेडियममध्ये १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. या लढतीसाठी स्पेनने त्यांच्या बलाढ्य संघात १४ वेळेचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदाल, डेव्हिड फेरर, फेलिसियानो लोपेज आणि मार्क लोपेज यांचा समावेश केला आहे. हे चारही खेळाडू विश्व रँकिंगच्या दृष्टिकोनातून भारतीय खेळाडूंच्या खूप पुढे आहेत.
नदालने नुकत्याच झालेल्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेच्या एकेरीत उपांत्य फेरी गाठली होती आणि त्याने मार्क लोपेजच्या साथीने पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. तथापि, वर्षअखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धा यूएस ओपनमध्ये नदालचे अंतिम १६ तून आव्हान संपुष्टात आले होते. (वृत्तसंस्था)