बोपन्नाचे पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद
By admin | Published: June 9, 2017 04:13 AM2017-06-09T04:13:03+5:302017-06-09T04:13:03+5:30
ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले
पॅरिस : रोहण बोपन्नाने गुरुवारी कॅनडाची त्याची सहकारी ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला.
बोपन्ना व डाब्रोवस्की या सातव्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत शानदार पुनरागमन केले. त्यांनी दोन मॅच पॉर्इंटचा बचाव करताना जर्मनीच्या अन्ना लेना गोरेनफिल्ड व कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीची झुंज २-६, ६-२, १२-१० ने मोडून काढली.
भारत व कॅनडा यांची जोडी एकवेळ दोन गुणांनी पिछाडीवर होती, पण गोरेनफिल्ड व फराह यांनी संधी गमावली. बोपन्ना व डाब्रोवस्की यांनी पूर्ण लाभ घेतला आणि दोन मॅच पॉर्इंट मिळवले. जर्मनीच्या खेळाडूने दुहेरी चूक करताच बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीचे जेतेपद निश्चित झाले.
बोपन्नाने कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याने २०१० मध्ये पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हकच्या साथीने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यावेळी त्याला अंतिम लढतीत ब्रायन बंधूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागले होते.
पहिला सेट गमावणाऱ्या बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीने दुसऱ्या सेटममध्ये सरशी साधत १-१ अशी बरोबरी केली. निर्णायक सेटमध्ये बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीने ३-० अशी अघाडी घेतली होती. त्यानंतर सलग पाच गुण गमावल्यामुळे ही जोडी ३-५ ने पिछाडीवर पडली. त्यानंतर त्यांनी ५-५ अशी बरोबरी साधली. सामन्याचे पारडे अखेरपर्यंत दोलायमान असलेल्या या लढतीत शेवटी बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीने सरशी साधली. (वृत्तसंस्था)
>‘‘ आम्ही दुसऱ्या सेटमध्ये दडपण न बाळगता खेळलो. त्यामुळे नैसर्गिक खेळ करता आला. आम्ही सांघिक कामगिरी करण्यात यशस्वी ठरलो. अंतिम लढत असल्यामुळे रिटर्न व सर्व्हिसवर गरजेपेक्षा अधिक जोर दिला. पहिल्या सेटनंतर सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर दिला. एकमेकांचे मनोधैर्य उंचावण्यावर भर दिला आणि हेच कारण निकालातील अंतर स्पष्ट करणारे ठरले. सूर गवसल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करता आली.’’
रोहण बोपन्ना
>बोपन्नापूर्वी केवळ लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या भारतीय खेळाडूंनी ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.