बोर्डे यांनी केले पुजाराचे कौतुक
By admin | Published: February 10, 2017 02:23 AM2017-02-10T02:23:50+5:302017-02-10T02:23:50+5:30
एका भारतीय मोसमात सर्वाधिक धावा फटकावण्याचा आपला विक्रम मोडल्याबद्दल माजी कर्णधार चंदू बोर्डे यांनी चेतेश्वर पुजाराचे कौतुक केले.
पुणे : एका भारतीय मोसमात सर्वाधिक धावा फटकावण्याचा आपला विक्रम मोडल्याबद्दल माजी कर्णधार चंदू बोर्डे यांनी चेतेश्वर पुजाराचे कौतुक केले.
हैदराबाद येथे बांगलादेशाविरुद्ध सुरू असलेल्या एकमेव कसोटीच्या पहिल्याच दिवशी पुजाराने हा विक्रम आपल्या नावे केला. गुरुवारी त्याने आॅफ स्पिनर मेहेदी हसनच्या चेंडूवर आॅफ ड्राईव्हचा खणखणीत चौकार वसूल करीत बोर्डे यांचा सुमारे ५ दशके जुना विक्रम मोडीत काढला. यावर प्रतिक्रिया देताना बोर्डे म्हणाले, ‘‘माझा विक्रम मोडला गेला, याचा आनंद वाटतो. पुजाराचे कौतुक करायला हवे. त्याची प्रतिभा वादातीत आहे. या मोसमात तो चांगला बहरात आहे. हा फॉर्म असाच कायम राहावा आणि त्याने भारताच्या विजयात सातत्याने योगदान द्यावे, यासाठी
माझ्या शुभेच्छा.’’
... तर विराट कोहली सचिनला मागे टाकेल
विराट कोहलीची फलंदाज आणि कर्णधार म्हणून सुरू असलेल्या वाटचालीची बोर्डे यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘‘कर्णधार म्हणून विराट दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होत आहे. कायम शिकण्याच्या वृत्तीमुळे त्याला हे यश मिळत आहे. त्याच्या फलंदाजीतील सहजता कुणालाही मोहात पाडणारी असते. कसोटीत नवीन असलेला विराट आणि आताचा विराट यांच्यात मोठा सकारात्मक बदल झालेला आहे. पूर्वी विराट कमालीचा आक्रमक होता. प्रत्येक चेंडूवर तुटून पडायचा. आता त्याने आपल्या आक्रमकतेला संयमाची जोड दिली आहे. त्याचे ‘शॉट सिलेक्शन’अफलातून असते. सध्या फलंदाज म्हणून तो शानदार कामगिरी करतोय. हा फॉर्म कायम राखल्यास तो सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडू शकतो. अर्थात, यासाठी त्याचा फिटनेस हा मुद्दा महत्त्वाचा असेल.’’