बीसीसीआयच्या मीडिया मॅनेजर अरोराला डच्चू
By admin | Published: February 7, 2017 02:33 AM2017-02-07T02:33:11+5:302017-02-07T02:33:11+5:30
भारतीय क्रिकेट संघाचे मीडिया मॅनेजर निशांत अरोरा हे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे खबरी म्हणून काम करीत असल्याचा संशय आल्यामुळे प्रशासकांच्या समितीने त्यांना डच्चू दिला आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मीडिया मॅनेजर निशांत अरोरा हे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे खबरी म्हणून काम करीत असल्याचा संशय आल्यामुळे प्रशासकांच्या समितीने त्यांना डच्चू दिला आहे.
भारतीय क्रिकेट संघांच्या ड्रेसिंग रूममधील खेळाडूंमध्ये झालेल्या महत्त्वाच्या चर्चा अरोरा ठाकूर यांना सांगत असल्याचे दोन वरिष्ठ खेळाडूंनी सांगितले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अरोरा यांच्या अशा चुगलीखोर वागण्यामुळे खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप या खेळाडूंनीसुद्धा केला आहे.
दरम्यान, अरोरा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की प्रशासकांच्या समितीने दिल्ली येथील कार्यालय मुंबईतील क्रिकेट हाऊसमध्ये स्थानांतरित करण्यात येत असल्याचे सांगितले. मला दिल्ली सोडायची नव्हती, त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. उर्वरित स्टाफ मुंबई येथेच काम करीत आहे. अरोरा हैदराबादलासुद्धा गेले नाहीत. दिल्ली कार्यालयातील सर्व कर्मचारी अनुराग ठाकूर यांच्या स्टाफचा भाग होता आणि सर्वोच्च न्यायालयातर्फे त्यांना हटविण्यात आल्यानंतर हा स्टाफ हटविण्यात येणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले होते.
सीओएच्या सदस्य डायना एडलजी म्हणाल्या, की त्यांनी कुणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही, केवळ कार्यालय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘‘आम्ही केवळ एवढेच म्हटले, की दिल्लीतील अध्यक्षांचे कार्यालय बंद करण्यात यावे आणि दिल्ली कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना जावे लागेल.
आम्ही कधीच निशांतचे नाव घेतले नाही; पण त्यांची जर दिल्ली कार्यालयात नियुक्ती करण्यात आली असेल तर त्यांना जावे लागेल. परंतु, जर मीडिया मॅनेजरचा करार यामध्ये येत नसेल, तर राहुल जोहरी (बीसीसीआय सीईओ) याबाबत अंतिम निर्णय घेतील. निशांतच्या पर्यायावरही राहुल निर्णय घेतील.’’ अरोरा १८ महिन्यांपासून बीसीसीआयचे मीडिया मॅनेजर
होते. (वृत्तसंस्था)