एका षटकात दोन्हीही हातांनी गोलंदाजी
By admin | Published: January 21, 2016 03:25 AM2016-01-21T03:25:24+5:302016-01-21T03:25:24+5:30
क्रीडानगरी म्हणून पांढरकवड्याचा उल्लेख क्रीडा जगतात नेहमी केला जातो. आता क्रिकेट या आंतरराष्ट्रीय खेळातही पांढरकवड्याच्या (जि. यवतमाळ) अक्षय किसन कर्णेवार
नरेश मानकर, पांढरकवडा (यवतमाळ)
क्रीडानगरी म्हणून पांढरकवड्याचा उल्लेख क्रीडा जगतात नेहमी केला जातो. आता क्रिकेट या आंतरराष्ट्रीय खेळातही पांढरकवड्याच्या (जि. यवतमाळ) अक्षय किसन कर्णेवार या युवकाने शहराचे नाव चमकविले आहे.
नुकत्याच मुंबई येथील वानखडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट सामन्यात विदर्भाचा स्पिनर अक्षय कर्णेवारने बडोदा विरुध्द एका ओव्हरमधील सहाही चेंडू हात बदलून फेकले. यामुळे फलंदाज त्रस्त झाले. त्याच्या या ‘रँडम बॉलिंग स्टाईल’ने भारतीय क्रिकेट जगतातील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
१९ वर्षाखालील विदर्भाच्या संघात अक्षयने बरेचदा आपली चुणूक दाखवली. यावर्षी विजय हजारे ट्राफीमध्येसुध्दा विदर्भ संघात तो होता. त्याने सात सामन्यांत १६ बळी घेतले. गेल्या ३ जानेवारीपासून मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सुरू झालेल्या सय्यद मुस्ताक अली टी२० सामने खेळून आलेल्या अक्षयचे मंगळवारी पांढरकवडा येथे उत्स्फूर्त स्वागत केले.
विदर्भाचे नाव चमकविणाऱ्या अक्षयचे सर्वात प्रथम ‘लोकमत’ने त्याच्या घरी जाऊन अभिनंदन केले. अक्षयचे वडील किसन कर्णेवार एस.टी.मध्ये क्लीनर आहेत. आई वंदना व बहीण दीक्षा यांनी अक्षयला प्रोत्साहन दिले. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेले कर्णेवार कुटुंब आपल्या मुलाने क्रिकेटमध्ये चांगलीे प्रगती करावी, यासाठी त्याला सर्वतोपरी मदत करतात.