दोन्ही हात नाहीत, तरीही करतो फलंदाजी अन गोलंदाजी
By admin | Published: March 7, 2016 03:13 AM2016-03-07T03:13:19+5:302016-03-07T12:14:18+5:30
दोन्ही हात नाहीत अन् क्रिकेट खेळू शकतो, अशी कल्पना कोणी करू शकतो का? परंतु, आमिर हुसेन लोन हा तरुण फक्त क्रिकेट खेळतच नाही, तर तो जम्मू काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधारही आहे.
बिजबेहडा (जम्मू काश्मीर) : दोन्ही हात नाहीत अन् क्रिकेट खेळू शकतो, अशी कल्पना कोणी करू शकतो का? परंतु, आमिर हुसेन लोन हा तरुण फक्त क्रिकेट खेळतच नाही, तर तो जम्मू काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधारही आहे.
महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जबरदस्त चाहता असलेल्या आमीरचे स्वप्न क्रिकेटपटू बनण्याचे होते; पण त्याच्या वडिलांच्या बॅट बनविण्याच्या कारखान्यात झालेल्या एका अपघातात आमीरने त्याचे दोन्ही हात गमावले. तरीही त्याचे स्वप्न थांबले नाही. श्रीनगरपासून ४२ कि.मी. अंतरावर असलेल्या वैगम गावात राहणारा आमीर वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, की मी सचिनचा फॅन असून त्याच्यासारखेच राष्ट्रीय संघातून खेळण्याची इच्छा बाळगून होतो. तो माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. अपघात झाला तेव्हा आमीर सात वर्षांचा होता. त्याला जीवदान देण्यात डॉक्टरांबरोबरच लष्कराचेही मोठे योगदान आहे. परंतु, तो आज जे स्वप्न जगतोय त्याचे श्रेय तो वडिलांना देतोय, ज्यांनी त्याच्या उपचारासाठी आपल्या आयुष्याची सर्व जमा पुंजी संपवली.
१९९७ साली तो वडिलांच्या कारखान्यात मोठ्या भावासाठी दुपारचे जेवण घेऊन गेला होता. भाऊ जेवत असताना आमीरने बॅट तयार करण्यासाठी वापरात येणारी आरा मशिन सुरू केली. यात कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकून त्याचे दोन्ही हात कट झाले होते. (वृत्तसंस्था)