सोबत सराव करण्याचा दोघींना लाभ मिळाला
By admin | Published: May 22, 2017 02:37 AM2017-05-22T02:37:39+5:302017-05-22T02:37:39+5:30
भारतीय महिला मल्ल साक्षी मलिकने रिओ आॅलिम्पिकमध्ये इतिहास घडविला आणि विनेश फोगाटला मात्र यश मिळवता आले नाही, पण उभय खेळाडूंदरम्यान
नवी दिल्ली : भारतीय महिला मल्ल साक्षी मलिकने रिओ आॅलिम्पिकमध्ये इतिहास घडविला आणि विनेश फोगाटला मात्र यश मिळवता आले नाही, पण उभय खेळाडूंदरम्यान कसल्याच प्रकारची प्रतिस्पर्धा नाही. उभय खेळाडू एकमेकींसोबत सराव करण्याचा लाभ घेत आहेत.
साक्षीने गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करताना आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला मल्ल होण्याचा इतिहास घडविला, पण विनेशला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली नाही.
आॅलिम्पिकमध्ये यश मिळवले असले तरी साक्षीचे पाय जमिनीवरच असून ती आताही माझ्यासोबत सराव करण्यास प्राधान्य देते, असे विनेशने सांगितले.
साक्षी ५८ किलो वजन गटात खेळते तर विनेशचा वजन गट ४८ किलो आहे. वजन गटात मोठा फरक असला तरी सोबत सराव करण्याबाबत बोलताना विनेश म्हणाली, ‘आम्ही प्रदीर्घ कालावधीपासून सोबत सराव करीत आहोत. वजन गटात फरक असल्याचा आम्हाला लाभ मिळतो. साक्षीचा वजन गट अधिक असल्यामुळे मी तिच्या शक्तीची बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे मला ताकद व स्टॅमिना वाढविण्यासाठी मदत मिळते. दुसऱ्या बाजूचा विचार करता माझ्या चपळपणाचा तिला वेग वाढविण्यास मदत होते. आम्ही दोघी एकमेकींना प्रेरित करण्यास प्रयत्नशील असतो.’
दुखापतीमुळे विनेश नऊ महिने व्यावसायिक स्पर्धेपासून दूर होती. अलीकडेच तिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पुनरागमन करताना रौप्यपदक पटकावले. (वृत्तसंस्था)