तळाच्या संघांना अखेरची संधी असेल
By admin | Published: April 25, 2017 01:05 AM2017-04-25T01:05:33+5:302017-04-25T01:05:33+5:30
गेल्या आठवड्यात आयपीएलमध्ये अनेक उतार - चढाव पाहायला मिळाले. जे सामने झाले त्यात काही संघ जिंकता जिंकता हरले
गेल्या आठवड्यात आयपीएलमध्ये अनेक उतार - चढाव पाहायला मिळाले. जे सामने झाले त्यात काही संघ जिंकता जिंकता हरले, तर जे संघ पराभवाच्या मार्गावर होते त्यांनी आश्चर्यकारक बाजी मारली. पण या सर्व चर्चा करण्याआधी मी सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. २४ एप्रिलला त्याने ४४ वा वाढदिवस साजरा केला. शिवाय वानखेडेवर झालेल्या पुण्याविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान एक सेलिब्रेशन पार्टीदेखील झाली आणि हे व्हायलाच पाहिजे होते. कारण तेंडुलकरचा जो प्रभाव मुंबई इंडियन्सवर राहिला आहे, किंबहुना केवळ मुंबईच नाही, तर भारतीय क्रिकेटवर राहिला आहे तो खूप जबरदस्त असून शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्यामुळे सर्वात आधी सचिनला खूप खूप शुभेच्छा...
आता वळूया आयपीएलकडे, मागच्या आठवड्यात दोन सामन्यांची सर्वाधिक चर्चा झाली. पहिली चर्चा म्हणजे पुणे सुपरजायंट्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मिळवलेला विजय. या वेळी महेंद्रसिंह धोनीने संघाला विजयी केले आणि यासह तो फॉर्ममध्ये आल्याचेही दिसले. महत्त्वाचे म्हणजे ज्या खेळासाठी धोनी ओळखला जातो त्या प्रकारचा खेळ करून तो सर्वांपुढे आला हे विशेष. याआधी त्याच्यावर फॉर्मच्या अभावामुळे खूप टीका झाली होती. पण त्याने सिद्ध केले, की फॉर्म हे तात्पुरता असून दर्जा कायम आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची सध्या खूप वाईट स्थिती आहे. कोलकाताविरुद्ध ४९ धावांंमध्ये संघ बाद झाला. आयपीएलच्या इतिहासामध्ये याहून वाईट स्थिती आतापर्यंत कोणत्याच संघाची झाली नसल्याने हा खूप मोठा झटका कोहलीसह त्याच्या संघाला बसला.
जे संघ दमदार आगेकूच करीत आहेत, त्यामध्ये निश्चित चर्चा होईल ती मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सची. कोलकाताने बेंगलोरविरुद्ध जबरदस्त विजय मिळवला. मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्यानंतरही ज्याप्रकारे त्यांनी बेंगलोरला पराभूत केले ते कौतुकास्पद आहे. ख्रिस गेल, कोहली, एबी डीव्हीलियर्स असे स्टार्स असतानाही इडनगार्डनवर वेगवान गोलंदाजांनी ज्याप्रकारे मारा केला ते कौतुकास्पद आहे. शिवाय सुनील नरेन आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंना एकही चेंडू टाकण्याची संधी मिळाली नाही. मला वाटतं, गंभीरने खूपच आक्रमक नेतृत्व केले. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सबाबत काय बोलावं? प्रत्येक सामन्यात ते अडचणीत आल्याचं वाटतं. परंतु, कुठे ना कुठे एक खेळाडू जबाबदारी खांद्यावर घेतो आणि संघाला विजयी करून जातो. मग तो नितीश राणा असो, पोलार्ड असो, पांड्याबंधू असो, पार्थिव पटेल असो की जोस बटलर असो... केवळ रोहित शर्मा मुंबईचा एकमेव खेळाडू बाकी राहिला आहे जो अद्याप आपल्या क्षमतेनुसार खेळलेला नाही. पण त्याने खूप चांगले नेतृत्व केले आहे. गुजरात, बेंगलोर खूप खाली राहिले आहेत. तसेच माझ्या मते किंग्ज इलेव्हन पंजाब आपल्या लयीमध्ये येत असल्याचे दिसत आहे. पण जर खरंच हाशिम आमला दुखापतग्रस्त असेल, तर त्यांच्यासाठी हा मोठा झटका असेल.
आता स्पर्धा मध्यावर आली आहे आणि जे संघ आघाडीवर आहेत ते आपले स्थान आणखी मजबूत करतील. त्याचवेळी बाकीच्या संघांना एक शेवटची संधी मिळेल पुनरागमनाची. जर त्यांनी सुधारणा केली नाही, तर येत्या २-४ दिवसांत कळेल, की प्लेआॅफमध्ये कोणत्या संघांचे स्थान निश्चित होईल. पण एक मात्र नक्की, की सध्याचे आघाडीचे चार संघ वेगात पुढे जात आहेत.
-अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार