गोलंदाजांची केली पाठराखण
By admin | Published: January 17, 2015 03:01 AM2015-01-17T03:01:19+5:302015-01-17T03:01:19+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागत असले
मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागत असले, तरी मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी मात्र गोलंदाजांची पाठराखण केला. भारतीय गोलंदाजांना अनुभव नसल्याचा यजमान संघाच्या फलंदाजांनी लाभ घेतला, असेही फ्लेचर म्हणाले.
फ्लेचर यांना आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय गोलंदाजीबाबत विचार व्यक्त करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे मान्य केले; पण गोलंदाजांवरील टीका होत काहीअंशी निरर्थक असल्याचे स्पष्ट केले. भारतीय संघाच्या विदेशातील निराशाजनक कामगिरीमुळे नेहमी टीकेचे लक्ष्य ठरलेले फ्लेचर म्हणाले, ‘‘गोलंदाजांवर बरीच मेहनत घेण्याची गरज आहे, याबाबत मी सहमत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे; पण, माझ्या मते भारताच्या वेगवान गोलंदाजांवर विनाकारण टीका झालेली आहे.’’
फ्लेचर म्हणाले, ‘‘या गोलंदाजांना येथील परिस्थितीचा अनुभव नव्हता. ईशांत शर्माने या मालिकेत ते सिद्ध केले.’’ आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेनंतर प्रशिक्षक म्हणून फ्लेचर यांचा करार संपणार आहे. फ्लेचर यांनी मोहंमद शमी व उमेश यादव यांची पाठराखण केली. या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलिया संघातील काही गोलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली.
‘‘कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांबाबत विचार करताना शमीने ३५.८०च्या सरासरीने १५ बळी घेतले. मिशेल जॉन्सनने ३५.३३च्या सरासरीने १३ पेक्षा अधिक बळी घेतले. त्यांची सरासरी जवळजवळ सारखी आहे. शमीचा हा पहिला दौरा होता. उमेशने ११ बळी घेतले. जोश हेजलवूड (१२ बळी) याच्या तुलनेत त्याने एक बळी कमी घेतला. कसोटी आणि वन-डे संघांत स्थान पक्के नसताना उमेशने ही कामगिरी केली, हे विसरता येणार नाही. संघातील स्थान पक्के नसताना गोलंदाजाचा आत्मविश्वास ढासळलेला असतो, तर त्याला लयही गवसत नाही. फ्लेचर यांनी भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले; पण त्यांनी फटक्यांची निवड करताना विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.
आगामी विश्वकप स्पर्धेबाबत फ्लेचर म्हणाले, ‘‘प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेतेपद कसे पटकवायचे, याची भारतीय खेळाडूंना चांगली कल्पना आहे. भारतीय संघ २०११च्या विजेतेपदाचा बचाव करू शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्यांत अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकतो.’’
फ्लेचर पुढे म्हणाले, ‘‘गेल्या ३ वर्षांत भारतीय संघ आयसीसीच्या ३ प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाला. त्यात आयसीसी टी२०- २०१२-१३ आणि २०१४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी- २०१३ या स्पर्धांचा समावेश आहे. यात भारतीय संघाने दोन सामने गमावले. त्यातील एक अंतिम लढत होती. भारतीय संघाची कामगिरी अभिमान बाळगण्यासारखी आहे. या स्पर्धांमध्ये संघ जवळजवळ एकसारखाच होता. त्यामुळे या खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव असून, त्यांना विजय कसा मिळवायचा, याची चांगली माहिती आहे.’’
(वृत्तसंस्था)