गोलंदाजांची भेदक कामगिरी;भारताचा 93 धावांनी विजय, मालिकेत विजयी आघाडी
By admin | Published: July 1, 2017 07:05 AM2017-07-01T07:05:02+5:302017-07-01T07:05:02+5:30
गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 93 धावांनी पराभव केला आहे. खडतर परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने केलेल्या 78 धावा आणि डावाच्या
ऑनलाइन लोकमत
अॅंटिग्वा, दि. 1 - गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 93 धावांनी पराभव केला आहे. खडतर परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने केलेल्या 78 धावा आणि डावाच्या अखेरीस केदार जाधवने (26 चेंडूत 40 धावा) केलेल्या फटकेबाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला 252 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने दिलेल्या 252 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 38.1 षटकांत केवळ 158 धावांमध्येच गारद झाला. भारताकडून फिरकी गोलंदाज आर.अश्विन आणि कुलदिप यादव यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. वेस्ट इंडिजकडून जेसन मोहम्मद याने सर्वाधिक 40 तर रोमॅन पॉवेल याने 30 धावांची खेळी करून थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला पण इतर फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. या विजयासोबतच भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अशी विजयी आघाडी घेतली आहे. महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
खराब सुरुवात झाल्यानंतर जबरदस्त सूर गवसलेला सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि युवराज सिंग यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करताना वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा डाव सावरला. अजिंक्य रहाणेने 72 धावांची चिवट खेळी केली. त्याला युवराज सिंगने 55 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावा करून चांगली साथ दिली.
रात्री पडलेल्या पावसामुळे तिसरा एकदिवसीय सामना ४५ मिनिटांनी उशिरा सुरू झाला. त्यानंतर नाणेफेक जिंकणाऱ्या वेस्ट इंडीजने भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. पहिल्या दोन सामन्यांत अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी शतकी सलामी दिली होती; परंतु आज मात्र, भारतीय संघ चांगली सुरुवात करू शकला नाही.
सामन्याच्या तिसऱ्याच षटकात कमिन्सने शिखर धवनला (२) बाद केले. कमिन्सच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर थर्डमॅनला हवेत मारलेला शिखर धवनचा फटका चेसने सहजरीत्या टिपला. विशेष म्हणजे जबरदस्त फार्मात असणारा धवन तब्बल ९ व्या डावानंतर एकेरी धावांत बाद झाला. धवन तंबूत परतला तेव्हा भारतीय संघाच्या धावफलकावर अवघ्या ११ धावा होत्या. त्यानंतर वेस्ट इंडीज गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. त्यातच चांगला सूर गवसलेल्या विराट कोहलीला कर्णधार जेसन होल्डरने बाद करीत भारताला दुसरा धक्का दिला. होल्डरचा उजव्या यष्टीवर उसळत्या चेंडूवर कोहलीचा गलीमध्ये उडालेला झेल केल होप याने डावीकडून सूर मारून टिपला. सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि युवराज सिंगने भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. युवराज- रहाणे जोडी बाद झाल्यानंतर धोनीने सामन्याची सुत्रं आपल्या हाती घेतली. केदार जाधवसोबत शानदार भागीदारी रचत त्याने भारताला 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला.
या मालिकेत पहिला सामना ३९ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला होता, तर पोर्ट आॅफ स्पेनचा दुसरा सामना भारताने १०५ धावांनी जिंकला होता.