गोलंदाजांनाही संधी असावी...
By admin | Published: January 18, 2017 05:09 AM2017-01-18T05:09:07+5:302017-01-18T05:09:07+5:30
एखाद्या गोष्टीचे पावित्र्य जपले जाते. एका विशिष्ट वयानंतरच धूम्रपान केले जाते.
एखाद्या गोष्टीचे पावित्र्य जपले जाते. एका विशिष्ट वयानंतरच धूम्रपान केले जाते. बस पूर्णपणे थांबल्याशिवाय त्यात बसता येत नाही. तुम्ही प्रथम श्रेणीत पास झाला तर गुणवंत विद्यार्थी ठरता आणि विशिष्ट धावसंख्या उभारली म्हणजे तुमचा विजय निश्चित मानला जातो. प्रत्येक वाक्यात तथ्य आहे; पण अखेरच्या वाक्यातील तथ्य मात्र आता कालबाह्य झाले आहे. टी-२० क्रिकेटचा प्रभाव वन-डे क्रिकेटवर पडल्यानंतर विजयासाठी किती धावसंख्या उभारावी, हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही.
दुसऱ्या वन-डे सामन्याची तयारी करीत असताना इंग्लंड संघाला हा प्रश्न नक्की भेडसावत असेल. कारण ही केवळ तीन सामन्यांची मालिका आहे. त्यामुळे नाणेफेक जिंंकून लक्ष्याचा पाठलाग करण्यास त्यांची पसंती राहण्याची शक्यता आहे. कारण प्रतिस्पर्धी संघासाठी कुठले लक्ष्य सुरक्षित राहील, याची कल्पना नाही. काहीअंशी गोलंदाजांचा विचार करणारी खेळपट्टी राहील, अशी आशा आहे. यापूर्वीची लढत म्हणजे माझे फलंदाज आणि तुमचे फलंदाज अशीच झाली. त्यात गोलंदाजांना कुठले स्थान नव्हतेच. उपखंडात दमदार खेळी करण्याची क्षमता असलेल्या सज्ज फलंदाजांमुळे इंग्लंड संघ बुचकळ्यात पडला असेल. दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धनेने भारतीय फलंदाजांबाबत भाष्य केले होते. जयवर्धने म्हणाला होता, ‘क्युबामध्ये ज्याप्रमाणे बॉक्सर्स तयार होतात, तसे मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी भारतात फलंदाज तयार होतात.’
टी-२० मुळे क्रिकेटला बरेच काही मिळाले आहे. अन्य बाबींसोबत वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजीत थरारकता आली आहे. (पीएमजी/ईएसपी)