4 चेंडूत 92 धावा देणा-या त्या गोलंदाजावर बंदी
By admin | Published: May 2, 2017 09:12 PM2017-05-02T21:12:19+5:302017-05-02T21:15:39+5:30
केवळ चार चेंडूत तब्बल 92 धावा देऊन जगावेगळी किमया करणा-या बांगलादेशच्या गोलंदाजावर बंदी
Next
>ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 2 - केवळ चार चेंडूत तब्बल 92 धावा देऊन जगावेगळी किमया करणा-या बांगलादेशच्या गोलंदाजावर बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेटची प्रतिमा खराब करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. सुजोन महमूद असं त्या "विक्रमवीर" गोलंदाजाचं नाव आहे. सुजोनवर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय अन्य एका सामन्यात बांगलादेशच्या आणखी एका गोलंदाजाने केवळ एका षटकात 62 धावा दिल्या होत्या त्याच्यावरही 10 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे . या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही खेळाडूंच्या क्लबवरही बंदी घालण्यात आली आहे.याच आरोपाखाली बोर्डाने दोन क्लब, त्यांचे खेळाडू, कर्णधार, व्यवस्थापक आणि पंचांनाही दंड ठोठावला आहे. शिवाय त्यांच्यावरही ५ वर्षांसाठी बंदी देखील घातली आहे.
ढाक्यातील सेकंड डिविजन क्रिकेट लीगमध्ये लालमटिया विरुद्ध एक्झोम क्रिकेटर्स यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला होता. या सामन्याच्या पहिल्याच ओव्हरच्या चार चेंडूत सुजोन महमूदनं 92 धावा देऊन एक्झोम क्रिकेटर्स संघाला विजयी केलं होतं. त्यानं 13 चेंडू वाइड टाकले. ते यष्टिरक्षकानं मुद्दाम अडवलेच नाहीत. त्यामुळे 13 चेंडूंमध्ये 65 धावा निघाल्या. त्याशिवाय, सुजोननं तीन नो बॉल टाकले. त्यावर एक्झोमनं 15 धावा घेतल्या. तर, उर्वरित 12 धावा सलामीवीर रहमाननं काढल्या. त्यामुळे लालमटियाचा दारूण पराभव झाला, पण त्यांचे शिलेदार मनातून खुश होते. कारण, पंचांच्या चुकीच्या निर्णयाच्या निषेधार्थ त्यांनी हे सगळं ठरवून केलं होतं.
या सामन्याच्या नाणेफेकीपासूनच पंचांनी पक्षपात केल्याचा आरोप लालमटिया क्लबनं केला होता. आमच्या कर्णधाराला टॉसनंतर शिक्का दाखवलाच गेला नाही. त्यानंतर, पंच सातत्याने चुकीचे, एक्झोमच्या बाजूने निर्णय देत गेले. त्यामुळे आमचे खेळाडू खवळले आणि त्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने या खोटेपणाचा विरोध करायचं ठरवलं. प्रथम फलंदाजी करताना आम्ही 14 षटकांत सर्वबाद 88 धावा केल्या होत्या. या सर्व धावा पहिल्याच ओव्हरमध्ये देऊन टाकायचं आमच्या तरुण खेळाडूंनी ठरवलं आणि तसंच केलं. त्यामुळे आम्ही या पराभवाने समाधानीच आहोत, असं क्लबचे सरचिटणीस अदनान रहमान दीपोन म्हणाले होते.