बॉक्सरच्या वाटेत काटेच काटे...

By admin | Published: July 23, 2016 05:27 AM2016-07-23T05:27:06+5:302016-07-23T05:27:06+5:30

बीजिंग आॅलिम्पिक भारतीय बॉक्सिंगच्या उदयाचे वर्ष होते. ७५ किलोगटात विजेंदरसिंग याने कांस्य जिंकताच भारत बॉक्सिंगच्या नकाशावर आला.

Boxer K ... | बॉक्सरच्या वाटेत काटेच काटे...

बॉक्सरच्या वाटेत काटेच काटे...

Next


बीजिंग आॅलिम्पिक भारतीय बॉक्सिंगच्या उदयाचे वर्ष होते. ७५ किलोगटात विजेंदरसिंग याने कांस्य जिंकताच भारत बॉक्सिंगच्या नकाशावर आला. पुढे २०१२च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये ‘मदर मेरी’ अर्थात मेरी कोमने आणखी एक पदक जिंकून दिले. पात्रता फेरीचा अडथळा दूर करण्यात अनेक दिग्गज बॉक्सर अपयशी ठरल्याने संख्या रोडावली आहे. मेरी कोमकडूनही अपेक्षाभंग झाला.
आता रिओत काय? या खेळात शिव थापा, मनोजकुमार आणि विकास कृष्णन हे तीनच बॉक्सर आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतील. तिघांवरही पदक जिंकण्याचे मोठे दडपण आहे.
लंडनमध्ये आठ बॉक्सर देशाचे प्रतिनिधित्व करीत होते. २०१६पर्यंत ही संख्या वाढण्याऐवजी रोडावली, यामागे भारतीय बॉक्सिंगच्या प्रशासकीय व्यवस्थेतील अस्थिरता हेच कारण आहे. अंतर्गत कलह पाहून भारतीय बॉक्सिंगला कुणाची नजर लागली का? असा सहज प्रश्न चाहत्यांना पडू शकतो. गेल्या २० वर्षांपासून भारताचे बॉक्सर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकून येत आहेत; पण रिओ आॅलिम्पिकला सामोरे जात असताना जी स्थिती आणि दडपण ओढवले, ते याआधी कधीही नव्हते. बॉक्सिंगने सुवर्ण क्षण अनुभवला आणि संकटाचादेखील. देशात सध्या खेळाची काळजी घेणारा महासंघ अस्तित्वात नाही. खेळाडूंची काळजी घेईल, असे कुणीही नाही. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बॉक्सरना प्रोत्साहन देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेअभावी खेळाडूंची कुचंबणा होत आहे.
शिव आणि विकास कृष्णन विश्व चॅम्पियनशिपमधील पदक विजेते आहेत, तर मनोजकुमार राष्ट्रकुल चॅम्पियन आहे; पण तिघांना मार्गदर्शन करेल, असा तांत्रिक अधिकारी रिओत सोबत नसेल. लंडन आॅलिम्पिकनंतर बॉक्सिंगला उतरती कळा लागली. बरेच पाणी वाहून गेल्यानंतरही प्रशासकीय सुधारणा घडून येण्याची चिन्हे नाहीत. पदाधिकाऱ्यांचे निवडणुकीतील गैरप्रकार खेळाडूंच्या मुळावर उठले. भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ बरखास्त होताच खेळाडूंच्या डोक्यावरील छत्र हरपले. नंतर बॉक्सिंग इंडिया स्थापन झाली खरी; पण वर्षभरदेखील टिकली नाही. राज्य संघटनांनी बंडाचे निशाण फडकावताच बॉक्सिंग इंडियाला गाशा गुंडाळावा लागला.
सध्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाची अस्थायी समिती भारतीय बॉक्सिंगचे संचालन करीत आहे. बॉक्सिंग महासंघ पुन्हा आकाराला यावा, यासाठी निवडणुका होतील त्या सप्टेंबरमध्येच. त्याआधीच आॅलिम्पिक आल्याने खेळाडूंच्या अडचणींमध्ये भर पडली. निलंबनामुळे खेळाडू पोरके झाले.
२००८मध्ये बीजिंगमध्ये विजेंदरला मिळालेल्या पदकाचे सोने करण्यात भारताचे बॉक्सिंग क्षेत्र काहीअंशी यशस्वी ठरले होते. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारत बॉक्सिंगमध्ये नंबर वन बनला. पुरुष आणि महिला बॉक्सर विविध स्पर्धांमध्ये ठसा उमटवत राहिले. लंडन आॅलिम्पिकसाठी तब्बल आठ बॉक्सर पात्र ठरले होते; पण बिकट अवस्था होऊ लागली ती २०१२पासून. सत्तेचा मोह आणि खेळाची लोकप्रियता काहींना रुचली नाही. या खेळाचे पदाधिकारी एकमेकांच्या मुळावर उठताच यंत्रणा ठप्प झाली.
स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडले. आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील अडचणी उद्भवू लागल्या. या स्तरावर तांत्रिक संचालन करणाऱ्या समितीत भारताचा एकही पदाधिकारी नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला कुणीच तांत्रिक अधिकारी नाही, हे कळाले की बॉक्सरची कामगिरी आणखीच खराब होत जाते. परंतु, खराब स्थितीतही भारतीय बॉक्सर न डगमगता रिओत चांगली कामगिरी करतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. अनुभवी आणि आशावादी वडीलधारी कोच गुरुचरणसिंग संधू या तिन्ही खेळाडूंसोबत आहेत. रिओत संख्येने कमी असलेले भारतीय बॉक्सर पदकात मागे राहू नयेत, अशा शुभेच्छा द्यायला हव्यात.
- किशोर बागडे, नागपूर

Web Title: Boxer K ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.