बॉक्सर्स ‘सुवर्ण’ दुष्काळ संपवतील?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:05 AM2018-08-11T03:05:36+5:302018-08-11T03:05:46+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा रेकॉर्ड चांगलाच आहे.
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा रेकॉर्ड चांगलाच आहे. पण २०१० च्या आशियाईनंतर या खेळात देशाला सुवर्ण मिळालेले नाही. यंदा इंडोनेशियात बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक मिळेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
विकास कृष्णा याच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा बाळगली जाऊ शकते. २६ वर्षांचा विकास या खेळात भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. विकासने २०१० मध्ये लाईटवेटमध्ये सुवर्ण जिंकले होते. सध्या मिडलवेट गटात खेळतो. २०१४ च्या आशियाई खेळात मनोज कुमारने मिडलवेट प्रकारात एक कांस्य जिंकले असून यंदा त्याच्याकडूनही सुवर्णााची अपेक्षा बाळगता येईल.
२१ वर्षांच्या गौरव सोळंकीकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. यंदा राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत फ्लायवेट प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा गौरव सोळंकी सुवर्ण नक्की जिंकेल, असे अनेकांना वाटते.
मेरी कोमची उणीव जाणवेल...
यंदा भारताला ‘सुपर मॉम’ मेरी कोमची उणीव नक्की जाणवणार आहे. आशियाई स्पर्धेत दोन पदके विजेती ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. २०१० मध्ये मेरीने कांस्य तसेच २०१४ मध्ये सुवर्ण जिंकले होते.
>पहिल्या सुवर्णाचा मान पदम बहादूरना
बॉक्सिंगमध्ये देशाला पहिले सुवर्ण जिंकून देण्याचा विक्रम पदम बहादूर यांच्या नावावर आहे. त्यांनी १९६२ च्या जकार्ता आशियाडमध्ये ६० किलो वजन गटात (लाईटवेट)ही कामगिरी करताना जपानचा बॉक्सर कानेमारु याच्यावर विजय नोंदविला होता.
आशियाईसाठी बॉक्सिंग संघ : पुरुष संघ: अमित पंघाल (४९ किलो), गौरव सोळंकी (५२), मोहम्मद हसमुद्दीन (५६), शिवा थापा (६०), धीरज (६४), मनोज कुमार (६९), विकास कृष्णा (७५). महिला संघ: सरजूबाला देवी (५१ किलो), सोनिया लाठेर (५७), पवित्रा (६० किग्रा).