बॉक्सिंग इंडियाला मान्यता नाही : आयओए
By admin | Published: December 20, 2014 02:19 AM2014-12-20T02:19:08+5:302014-12-20T02:19:08+5:30
बॉक्सिंगच्या संचालनासाठी केवळ भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (आयएबीएफ) मान्यता देऊ. बॉक्सिंग इंडियाला मान्यता
चेन्नई : बॉक्सिंगच्या संचालनासाठी केवळ भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (आयएबीएफ) मान्यता देऊ. बॉक्सिंग इंडियाला मान्यता प्रदान करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी आज, शुक्रवारी स्पष्ट केले.
‘आयओए’च्या वार्षिक आमसभेनंतर रामचंद्रन यांना या आशयाचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ‘आयओए देशात बॉक्सिंगच्या संचालनासाठी केवळ ‘एआयबीएफ’ला मान्यता देईल.’ बॉक्सिंग इंडियाला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने मान्यता दिली आहे. भारताची महिला बॉक्सर एल. सरितादेवी हिच्यावर झालेल्या अन्यायाला बॉक्सिंग इंडियानेच वाचा फोडली होती. बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जाजोदिया यांनी आयओए आणि क्रीडा मंत्रालयाकडे मान्यतेसाठी अर्ज केल्याची माहिती अलीकडे दिली होती; पण रामचंद्रन यांच्या वक्तव्यामुळे बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्याचा प्रस्ताव वादात अडकला आहे.
रामचंद्रन म्हणाले, ‘ग्लास्गो राष्ट्रकुल, इंचियोन आशियाडमधील पदक विजेत्यांचा रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. त्यात सुवर्ण विजेत्या खेळाडूस तीन लाख, रौप्य विजेत्यास दोन लाख आणि कांस्य विजेत्याला एक लाख दिले जातील.’
आयओएशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा संस्थांना चार लाखांचे दरवर्षी अनुदान देण्याची घोषणा रामचंद्रन यांनी केली. आयओए बैठकीचे चेन्नईत आयोजन दोन दशकानंतर करण्यात आले, हे विशेष. ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्यपदके जिंकली. (वृत्तसंस्था)