ब्रेथवेटची शतकाकडे वाटचाल

By admin | Published: November 1, 2016 02:14 AM2016-11-01T02:14:02+5:302016-11-01T02:14:02+5:30

वेस्ट इंडिजने देखील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या दिवशी स्वत:ला सावरत पहिल्या डावात ६ बाद २४४ धावा उभारल्या

Braithwaite moves towards the century | ब्रेथवेटची शतकाकडे वाटचाल

ब्रेथवेटची शतकाकडे वाटचाल

Next


शारजा : सलामीवीर क्रेग ब्रेथवेट झुंजार शतकापासून केवळ पाच धावांनी दूर असून वेस्ट इंडिजने देखील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या दिवशी स्वत:ला सावरत पहिल्या डावात ६ बाद २४४ धावा उभारल्या. ब्रेथवेट २०६ चेंडू खेळून ९५ धावांवर आणि जेसन होल्डर ६ धावांवर नाबाद होता.
पाकच्या पहिल्या डावातील २८१ धावांच्या मोबदल्यात वेस्ट इंडिज अद्याप ३७ धावांनी मागे असून चार फलंदाज शिल्लक आहेत. उपाहारापर्यंत विंडीजने ३८ धावांत तीन गडी गमविले होते. ब्रेथवेट आणि रोस्टन चेज(५० धावा)यांनी पाचव्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. ब्रेथवेटने सहाव्या गड्यासाठी शेन डॉरिचसोबतही(४७) ८३ धावांची भक्कम भागीदारी करीत चहापानापर्यंत ४ बाद १४१ धावा उभारल्या होत्या. अखेरच्या सत्रात संघाने आणखी दोन फलंदाज गमविले.
त्याआधी पाकने २८१ धावा केल्या. सकाळी २६ धावांत वाचलेले दोन फलंदाज गमविले. मोहम्मद आमीर २० आणि यासिर शाह १२ यांनी नवव्या गड्यासाठी ३२ धावा केल्या. दोघेही अल्जारी जोसेफ याचे बळी ठरले. जोसेफने ५७ धावांत दोन, लेग स्पिनर देवेंद्र बिशुने ७७ धावांत चार आणि वेगवान गोलंदाज शेनन गॅब्रियल याने ६७ धावांत तीन गडी बाद केले.
विंडीजची सुरुवातदेखील खराब झाली. सलामीचा लियोन जॉन्सन केवळ एक धाव काढून वहाब रियाझच्या चेंडूवर पायचित झाला. ड्वेन ब्राव्हो(११)याला देखील रियाझ आणि आमीर यांनी आखूड टप्प्याचे चेंडू टाकून वारंवार अडचणीत आणले. ब्राव्होने जुल्फिकार बाबरच्या चेंडूवर आमीरकडे झेल दिला. मर्लोन सॅम्युअल्स हा भोपळा न फोडताच शाहच्या चेंडूवर पायचित झाला. ब्रेथवेट आणि जर्मेन ब्लॅकवुड २३ यांनी चौथ्या गड्यासाठी ३० धावा केल्या. आमीरने ब्लॅकवुडला पॅव्हेलियनची वाट दाखवित ही जोडी फोडली. ब्रेथवेटने आॅफ स्पिनर मोहम्मद नवाझ याच्या चेंडूवर एक धाव घेत १२ वे अर्धशतक गाठले.
पाकने दुबईत झालेल्या पहिल्या कसोटीत ५६ आणि दुबईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १३३ धावांनी विजय मिळवित वेस्ट इंडिजवर २-० ने आघाडी घेतली. पाकच्या नजरा सध्या ‘क्लीन स्वीप’कडे आहेत.(वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव सर्वबाद २८१ धावा. वेस्ट इंडिज पहिला डाव ७८ षटकांत ६ बाद २४४ धावा. (क्रेग ब्रेथवेट नाबाद ९५, जेसन होल्डर नाबाद ६, मोहम्मद आमीर ४४/२, यासिर शाह ५६/१.)

Web Title: Braithwaite moves towards the century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.