‘आयओसी’कडून मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकसाठी ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:38 AM2019-11-01T03:38:29+5:302019-11-01T06:27:05+5:30
‘माझ्याविरुद्ध नकारात्मक मोहीम सुरू असताना माझे नाव अॅम्बॅसिडर म्हणून आले याचा आनंद आहे
नवी दिल्ली : सहा वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरीकोम हिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी आशिया स्तरावर बॉक्सिंगची ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून निवड केली. दहा खेळाडूंच्या दूत समुहात मेरीचा समावेश करण्यात आला आहे.
या समुहात मेरीसह दोन वेळेचा ऑलिम्पिक तसेच विश्व स्पर्धेचा सुवर्ण विजेता यूक्रेनचा वासिल लामाचेनको (युरोप), पाच वेळेचा ऑलिम्पिक चॅम्पियन व २०१६ चा ऑलिम्पिक विजेता ज्युलियो ला क्रूझ (अमेरिका)आदी दिग्गजांना समावेश आहे.
राज्यसभा सदस्य असलेली मेरीकोम म्हणाली, ‘हा मोठा सन्मान आहे, या शिवाय जबाबदारीही आहे, मी सहकाऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणार आहे.’ ऑलिम्पिक सराव स्पर्धेसाठी संघ पाठविताना मेरीकोमच्या नावाला पसंती दर्शविताच मेरी वादात अडकली होती. आता आयओसीने तिला दूत म्हणून निवडले.
याविषयी मेरी म्हणाली, ‘माझ्याविरुद्ध नकारात्मक मोहीम सुरू असताना माझे नाव अॅम्बॅसिडर म्हणून आले याचा आनंद आहे.’ ३६ वर्षांच्या मेरीने विश्व चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक आठ पदके जिंकली आहेत. ५१ किलो गटात ऑलिम्पिक कांस्यसह ती पाचवेळा आशियाई चॅम्पियन राहिली. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतही मेरीच्या नावर सुवर्ण पदकाची नोंद आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगची मुख्य स्पर्धा तसेच पात्रता स्पर्धांच्या आयोजनात मेरीकडून सल्ला घेण्यात येणार असल्याचे आयओसीने म्हटले आहे.
हा माझा मोठा सन्मान आहे, त्याच बरोबर ही माझ्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी ही आहे. कारण मला माझ्या सहकारी खेळाडूंच्या मदतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मी नेहमीप्रमाणे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझ्या विरुद्ध कोणतेही सबळ कारण नसताना नकारात्मक मोहीम सुरू असताना हा सन्मान मिळणे खरोखरच गंमतीदार आहे. - मेरी कोम