Fifa Football World Cup: ब्राझीलचा बाद फेरीत प्रवेश, स्वित्झर्लंडला १-० ने नमवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:54 AM2022-11-29T11:54:52+5:302022-11-29T11:56:08+5:30
भक्कम बचावाच्या स्वित्झर्लंडला १-० ने नमवले
दोहा : स्टार खेळाडू नेमारच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या ब्राझीलने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना स्वित्झर्लंडला १-० असे नमवत यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. यासह ग गटात ६ गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावत ब्राझीलने बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला.
बचावपटूंचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात ब्राझीलच्या कॅसेमिरोने एकमेव आणि निर्णायक गोल केला. यंदाच्या विश्वचषकाची बाद फेरी गाठणारा ब्राझील दुसरा संघ ठरला. याआधी गतविजेत्या फ्रान्सने सलग दुसऱ्या विजयानंतर बाद फेरी गाठली होती. स्वित्झर्लंडला बाद फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी आता २ डिसेंबरला सर्बियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. पहिल्या सत्रात दोन्ही संघांच्या बचावफळीने दमदार खेळ करत सामना गोलशून्य बरोबरीत राखला. दोन्ही संघाचा पवित्रा पाहून सामना गोलशून्य बरोबरीत राहणार असल्याचे दिसत होते. मात्र, ८३व्या मिनिटाला कॅसेमिरोने स्वित्झर्लंडच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत चेंडू थेट गोलजाळ्यात धाडला. त्याआधी, विनिशियस ज्युनिअर याने ६६व्या मिनिटाला अप्रतिम गोल केला होता. परंतु, ‘वार’ प्रणालीत तो ऑफ साइड असल्याचे स्पष्ट झाल्याने हा गोल अवैध ठरला.
ब्राझील विश्वचषक स्पर्धेत सलग १७ साखळी सामन्यांमध्ये अपराजित राहिले.
२००६ पासून स्वित्झर्लंडला एकदाही विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीतील सुरुवातीचे सलग दोन सामने जिंकता आलेले नाही.
आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत स्वित्झर्लंडला दक्षिण अमेरिकन देशांविरुद्धच्या नऊ सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे.
२० वर्षीय फॅबियन रीडर हा जोहान जुरोनंतरचा (१९ वर्ष, २००६) विश्वचषक स्पर्धा खेळणारा दुसरा सर्वात युवा स्विस खेळाडू ठरला.
ब्राझीलने विश्वचषकातील आपल्या अखेरच्या दहापैकी नऊ गोल हे सामन्यातील दुसऱ्या सत्रातच नोंदवले आहेत. सामन्यात ब्राझीलने गोल करण्याच्या १३ संधी निर्माण करताना पाचवेळा गोलजाळ्याचा वेध घेतला. स्वित्झर्लंडने गोल करण्याच्या ६ संधी निर्माण केल्या; पण त्यांना एकदाही गोलजाळ्यावर आक्रमण करता आले नाही.