ब्राझीलने जर्मनीचा वचपा काढला
By admin | Published: August 22, 2016 04:49 AM2016-08-22T04:49:24+5:302016-08-22T04:49:24+5:30
कर्णधार नेमारने केलेला अफलातून गोलच्या जोरावर ब्राझीलने जर्मनीचा ५-४ गोलने पाडाव करीत आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.
रिओ : पेनेल्टी शूट आऊटमध्ये गोलरक्षक विवेरटोनने पीटरसन नील्सचा अडविलेला गोल आणि कर्णधार नेमारने केलेला अफलातून गोलच्या जोरावर ब्राझीलने जर्मनीचा ५-४ गोलने पाडाव करीत आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे या विजयासह यजमान ब्राझीलने विश्वचषक स्पर्धेत जर्मनीकडून झालेल्या पराभवाचाही वचपा काढला. दखल घेण्याची बाब म्हणजे, आॅलिम्पिक मध्ये पाचवेळचा विश्वविजेत्या ब्राझीलला १९८४, १९८८ व २०१२ मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु, यंदा घरच्या मैदानावर खेळताना ब्राझीलने सुवर्ण पटकावण्यात यश मिळवले.
माराकाना स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम लढतीत सुवर्णपदक जिंकणे आणि विश्व चषकाचा वचपा काढणे या निर्धाराने खेळणाऱ्या ब्राझीलच्या खेळाडूंनी सुरूवातीपासून नियोजनपूर्वक सुरूवात केली. त्यांची जोरदार आक्रमने जर्मनीचा गोलरक्षक हॉन टिमोने परतावून लावली.
२६ व्या मिनिटाला हुकमी नेमारने शानदार गोल करून ब्राझीलला आघाडी मिळून दिली. मात्र, ५९ व्या मिनिटाला जर्मनीच्या मेयेर माक्सीमीलीयनने गोलकरून सामन्यात १-१ गोल बरोबरी साधली. यावेळी पुन्हा एकदा दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरपर्यंत बरोबरी कायम राहिल्यानंतर सामना अतिरीक्त वेळेत खेळविण्यात आला. यावेळीही बरोबरी कायम राहिल्याने सामना पेनेल्टी शूटआऊटमध्ये गेला.
यावेळी जर्मनीकडून पहिला गोल जिंटर मताहिसने केला. दुसरा गोल गर्नाब्रे सेर्गेने केला. तर, तिसरा व चौथा गोल अनुक्रमे ब्रॅन्ट ज्युलियन आणि सुले नीखिल्सने यांनी नोंदवला. पीटरसन नील्सने मारलेली किक गोलरक्षक विवेरटोनने अडवली. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. यावेळी एका गोलने आघाडीवर असलेल्या ब्राझीलला नेमारने विजयी केले.