‘अडथळा शर्यतीत स्पर्धा विक्रमाचा सिद्धांत’
By admin | Published: February 13, 2015 12:35 AM2015-02-13T00:35:15+5:302015-02-13T00:35:15+5:30
महाराष्ट्राच्या सिद्धांत थिगालियाने पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत १३.८३ सेकंदांची वेळ नोंदवून स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.
तिरुअनंतपुरम : महाराष्ट्राच्या सिद्धांत थिगालियाने पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत १३.८३ सेकंदांची वेळ नोंदवून स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.
केरळ विद्यापीठ स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या अॅथलेटिक्स प्रकारात सिद्धांत थिंगालियाने पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पटकाविले. सिद्धांतने २००१मध्ये गुरप्रीतसिंगने केलेला १४.१० से. विक्रम मोडीत काढला. या प्रकारात महाराष्ट्राच्या अनिश जोशीला मात्र पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सायकलिंग : पुरुषांच्या ३० किलोमीटर पॉइंट रेस प्रकारात महाराष्ट्राच्या अरविंद पनवारने ४१ गुण संपादन करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. अभिनंदन भोसलेला २१ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सकाळी झालेल्या पुरुषांच्या ४ किलोमीटर सांघिक परस्यूट प्रकारात महाराष्ट्राच्या प्रीतसिंग, अरविंद पनवार, गणेश पवार व अभिनंदन भोसले या चौघांनी ४ मि. ५५.२२८ से. वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले.
तलवारबाजी : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी अनुक्रमे इपी व सायबर प्रकारात कांस्यपदक आपल्या नावावर केले. पुरुष गटात कर्नाटकाविरुद्ध झालेल्या लढतीत अजिंक्य दुधारेने आपल्या नावाला साजेसा अफलातून खेळ करीत कर्नाटकच्या खेळाडूविरुद्ध बचावात्मक आणि प्रति-आक्रमणाचा खेळ करीत २२ विरुद्ध ५ गुणांनी पराभव करून आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली. सागर मगरेने ६ व अक्षय देशमुखने ८ गुण संपादन केले. महिलांच्या सांघिक सायबर प्रकारात अस्मिता दुधारेने १२, निशा पुजारीने १८ व स्नेहल विधातेने १५ गुण संपादन करून कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या १० हजार मी. धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्रच्या स्वाती गाढवेने ३४:५९.७३ वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. स्वातीचे हे दुसरे पदक आहे. कविता राऊतला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)