ब्रीज हा बुद्धीचा खेळ आहे, त्याने खेळाडूंच्या गुणवत्तेत वाढ- डॉ. उल्हास कोल्हटकर
By मुरलीधर भवार | Published: September 24, 2022 07:46 PM2022-09-24T19:46:54+5:302022-09-24T19:47:26+5:30
डोंबिवलीत महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरूवात
डोंबिवली: महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मण सभा, डोंबावली, ठाणे यांच्या वतीने ब्राह्मण सभा डोंबावली येथील हॉलमध्ये २४ आणि २५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत टीम चॅम्पियनशिप आणि पेअर्स चॅम्पियनशिप अश्या दोन प्रकारांचा समावेश आहे. आज या स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष जे. के. भोसले, सचिव हेमंत पांडे, इंडियन ब्रीज फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा या स्पर्धेचे प्रमुख आनंद सामंत, ब्राह्मण सभाचे चेअरमन डॉ. उल्हास कोल्हटकर, अध्यक्ष विनायक भोळे, कार्यकारी अध्यक्षा श्रीमती सूचिता पिंगळे क्रीडा विभाग प्रमुख श्रीपाद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलतांना डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले की, ब्रीज हा बुद्धीचा खेळ आहे. या खेळामुळे खेळाडूंचा सर्वांगीण विकास घडतो. ब्राह्मण सभा संस्थेच्या वतीने ब्रीजसाठी सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल असे सांगितले. यावेळी जे. के. भोसले, हेमंत पांडे, यांनी आपले मनोगत व्यक्त करून या सुंदर आयोजनाबद्दल ब्राह्मण सभा, डोंबिवली यांचे आभार व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नुकत्याच ऑगस्टमध्ये इटली येथे झालेल्या विश्व ब्रीज चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कासया पदक मिळविणारे खेळाडू राशी जहागीरदार, पावन गोयल, विद्या पटेल, कल्पना गुर्जर आणि प्रशिक्षक अनिरुद्ध संझगिरी, विनय देसाई, आनंद सामंत आणि मुख्य व्यवस्थापक हेमंत पांडे यांचा ब्राह्मण सभा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत टीम चॅम्पियनशिपमध्ये फ्रेमिनीज, अमोनारा, मित्र विहार, गोल्ड गर्ल्स, रत्नागिरी, समाधान, दिवाणजी, हरी ओम, स्वामी समर्थ, एस. व्ही. कुलकर्णी, गुरु प्रसाद, इंडियन ज्यूनियर्स, डोंबिवली फ्रेंड्स, हॅप्पी गो लकी, विक्रांत या १५ संघानी सहभाग घेतला आहे.
आज ६ बोर्डाचे प्रत्येकी चार राऊंडस खेळविले गेले. यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये आनंद सामंत, एन. राजारामन, एस. श्रीधरन, जयंत मुळीक, अरुण बापट आणि हेमंत भावे यांचा समावेश असेलल्या यजमान डोंबावली फ्रेंड्स संघाने चांगली सुरवात करून १९.०१ गुण मिळवत आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये समाधान संघाच्या रवी रमण, जेएश शहा, अनंत सोमणी, राजेश सोमणी रवी शेट्टी आणि मितल ठाकूर यां खेळाडूंनी एकमेकमध्ये चांगला समन्वय साधून सुंदर खेळ करत सर्वात जास्त ३३. ७९ गुण मिळवत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली आहे. तर पहिल्या राऊंडमध्ये चवथ्या क्रमांकवर असलेल्या नंदादीप संघाने २८.१७ गुणासह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्याखालोखाल आमनोरा (२७.७६ गुण) आणि फ्रेमिनीज संघ (२५.६० गुण) यांनी अनुक्रने तीसऱ्या आणि चवथ्या स्थानावर होते. तिसऱ्या राऊंडमध्येही समाधान संघाच्या खेळाडूंनी आपल्या खेळात सातत्य राखून आपली आघाडी टिकविणे ठेवली होती. तर चवथ्या राऊंडमध्ये बरेच बदल दिसून आले. या राऊंडमध्ये फ्रेमिनीज संघाच्या अनिरुद्ध सांझगिरी, भास्कर पेंडसे, राजू खरे, स्टेनी नाजरेथ, सुकृत विजयकर या खेळाडूनी जिद्दीने खेळ करून सर्व संघावर आघाडी घेवून ५७.५१ गुणांसह पहिल्या क्रमांकवर झेप घेतली आहे. तर यजमान डोंबिवली फ्रेंडस संघाच्या खेळाडूनी पुनः जोर लावत ५७.४० गुण मिळवत आपल्या संघाला दुसऱ्या क्रमांकवर आणण्यात यश मिळविले आहे. तर मित्रविहारचे खेळाडू हेमंत पांडे, अतुल दशपुते, मोहन उकीडवे आणि तुषार मोगरे यांनी पहिल्या दोन राऊंड नंतर चांगला जम बसवत तीसऱ्या राऊंडमध्ये चवथा क्रमांक तर चवथ्या राऊंडमध्ये थेट ५४.९१ गुणासह आपल्या संघाला तीसऱ्या क्रमांकवर नेण्यात यश मिळविले आहे.
उद्या सकाळी उर्वरित सहा बोर्डचाचे दोन राऊंड खेळविले जातील. यानंतर गुणानुक्रमे पहिले सहा संघ या टीम चॅम्पिअनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. उर्वरित संघातील खेळाडूंना पेअर्स प्रकारात खेळावे लागेल. तसेच या पेअर्स प्रकारात आणखी काही खेळाडूंचा सहभाग असणार आहे अशी माहिती या स्पर्धेचे चिफ डायरेक्टर बी. जी. दक्षिणदास यांनी दिली.
आज चाैथ्या राऊंडनंतरची गुणसंख्या-
1. फ्रेमिनीज (५७.५१ गुण), 2. डोंबिवली फ्रेंड्स (५७. ४० गुण) 3. मित्र विहार(५४.. ९१ गुण) 4. अमोनारा (४८. ७६ गुण) 5. समाधान (४८.. १२ गुण), 6. गोल्ड गर्ल्स (४५. ८८)