भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

By admin | Published: June 6, 2016 02:37 AM2016-06-06T02:37:07+5:302016-06-06T02:37:07+5:30

भारतीयांनी मुंबई महापौर खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना बलाढ्य विदेशी खेळाडूंना पिछाडीवर टाकले. तामिळनाडूच्या इंटरनॅशनल मास्टर विसाख

Brilliant performance of Indian athletes | भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

Next

मुंबई : भारतीयांनी मुंबई महापौर खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना बलाढ्य विदेशी खेळाडूंना पिछाडीवर टाकले. तामिळनाडूच्या इंटरनॅशनल मास्टर विसाख एन. आर. याने रशियाचा ग्रँडमास्टर मिखाइल अलीबीनला धक्का दिला. तर ग्रँडमास्टर दीपतयन घोषने सर्वाधिक ५ गुणांसह एकाकी अव्वल स्थान पटकावले आहे.
वांद्रे येथील लाऊंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुजरातच्या वरुण भट याने ‘ब’ गटात वर्चस्व राखताना विजेतेपदाला गवसणी घातली. तर आसामच्या सिंग सोरम राहुल याने दुसऱ्या स्थानी झेप घेत उपविजेतेपदावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या सिद्धान्त गायकवाडला तृतीय स्थानी समाधान मानावे लागले.
ग्रँडमास्टर दीपतयन (इलो २५६२) व फिडे मास्टर रघुनंदन के. एस. (इलो २२९५) यांच्यातील लढतीला सिसिलियन डावाने सुरुवात झाली. दोघांनी सावध पवित्रा घेत कूच केली. २०व्या चालीनंतर दीपतयनने आक्रमक चाली रचून २४व्या चालीत प्याद्याच्या निर्णायक चालीच्या जोरावर बाजी मारली.
त्याचवेळी स्पॅनिश ओपनिंग पद्धतीने सुरुवात झालेल्या मिखाइल आणि विसाख यांच्यातील लढत ३०व्या चालीपर्यंत बरोबरीत सुरू होती. मात्र ३१व्या चालीमध्ये मिखाइलने विसाखच्या उंटाकडे दुर्लक्ष करीत घोड्याला मारले आणि हीच घोडचूक मिखाइलच्या पराभवास कारणीभूत ठरली. यानंतर ३५व्या चालीत मिखाइलने पराभव मान्य केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Brilliant performance of Indian athletes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.