जखमी विकासला कांस्य
By Admin | Published: June 25, 2016 02:45 AM2016-06-25T02:45:54+5:302016-06-25T02:45:54+5:30
रिओ आॅलिम्पिकसाठी कोटा मिळवून देणारा भारतीय बॉक्सर विकास कृष्णन (७५ किलो) याला येथे आइबा विश्व क्वॉलिफार्इंग स्पर्धेत शुक्रवारी जखमी झाल्यामुळे उपांत्य फेरीतून माघार घ्यावी लागली.
बाकू (अजरबैजान) : रिओ आॅलिम्पिकसाठी कोटा मिळवून देणारा भारतीय बॉक्सर विकास कृष्णन (७५ किलो) याला येथे आइबा विश्व क्वॉलिफार्इंग स्पर्धेत शुक्रवारी जखमी झाल्यामुळे उपांत्य फेरीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मनोज कुमार (६४ किलो) यालादेखील कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पण ८१ किलो वजन गटात सुमित सांगवान (८१) याची आॅलिम्पिकला पात्र ठरण्याची आशा संपुष्टात आली.
विकास आणि अन्य भारतीय बॉक्सर मनोज कुमार यांनी आपापल्या वजन गटांत गुरुवारी उपांत्य फेरी गाठतानाच रिओ आॅलिम्पिकचे तिकीट पक्के केले होते. त्याचबरोबर रिओसाठी पात्र ठरणाऱ्या भारतीय मुष्टियोद्ध्यांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.
विकास चेहऱ्यावर जखम झाल्यामुळे उपांत्य फेरीत खेळू शकला नाही. हा भारतीय मुष्टियोद्धा उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या ली डोंगयून याच्याविरुद्ध खेळताना जखमी झाला होता. विकासने हा सामना जिंकतानाच आॅलिम्पिक कोटा मिळविला होता; परंतु चेहऱ्यावर झालेल्या जखमेमुळे त्याला टाके पडले आणि तो शुक्रवारी तुर्कमेनिस्तानच्या आचिलोव अर्सालानबेकविरुद्ध उपांत्य फेरीत खेळू शकला नाही.
विकासला वैद्यकीयदृष्ट्या अनफिट घोषित करण्यात आले होते, असे भारतीय पदक अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या डोळ्यांवर टाके असून, डॉक्टरांनी त्याला उपांत्य फेरीत खेळण्यास मज्जाव केला होता.
४९ किलो वजन गटात लेशराम देवेंद्रो सिंह याची लढत स्पेनच्या कारमोना हेरेडिया सॅम्युअलविरुद्ध होईल. या गटात फक्त दोन कोटा बाकी आहे. त्यामुळे त्याला पात्र होण्यासाठी जिंकणे आवश्यक आहे.
८१ किलो वजन गटात सुमित सांगवान (८१) याची आॅलिम्पिकला पात्र ठरण्याची आशा संपुष्टात आली. सुमितला रशियाच्या अव्वल मानांकित पीटर खामोकोव्ह याच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. रशियन बॉक्सरने सुवर्णपदक जिंकले असते तर सुमित आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला असता; परंतु खामोकव्हने उपांत्य फेरीच्या लढतीतून माघार घेतली. त्यामुळे सुमितच्या आशा संपल्या.