मेरी कोम, जमुना, लवलिनाला कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 04:26 AM2019-10-13T04:26:14+5:302019-10-13T04:26:29+5:30
तिसरी मानांकित मेरी कोम युरोपियन चॅम्पियनशिप आणि युरोपियन क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती काकीरोग्लूकडून १-४ ने पराभूत झाली.
उलान उदे : सहावेळची विश्वविजेती एम. सी. मेरी कोम जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य लढतीत ‘वादग्रस्त’ निर्णयाची बळी ठरली. शनिवारी तुर्कस्तानची प्रतिस्पर्धी बुसेनाज काकीरोग्लू हिच्याविरुद्ध ज्युरीच्या वादग्रस्त निर्णयामुळे पराभवाचा धक्का बसल्याने ५१ किलो वजन गटात तिला केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मेरीने केलेले अपीलही तडकाफडकी फेटाळून लावण्यात आले, हे विशेष. या स्पर्धेत पदार्पण करणारी जमुना बोरो हिला ५४ किलो गटात, तर लवलिना बोरगोहेन (६९) हिला उपांत्य लढतीत पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
तिसरी मानांकित मेरी कोम युरोपियन चॅम्पियनशिप आणि युरोपियन क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती काकीरोग्लूकडून १-४ ने पराभूत झाली. मेरीच्या विरोधात निकाल जाताच भारतीय पथकाने रिव्ह्यू मागितला होता. तथापि, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या तांत्रिक समितीने मेरी कोमचे अपील फेटाळून लावले.
पहिल्या फेरीपासून मेरीने लढतीवर वर्चस्व गाजविले. मेरीचे हल्ले आक्रमक होते; पण काकीरोग्लूला फूटवर्कचा लाभ घेण्यात अपयश आले. दुसऱ्या फेरीत मात्र काकीरोग्लूने मुसंडी मारली. अखेरच्या तीन मिनिटांत काकीरोग्लूने मेरीवर वर्चस्व गाजविले. या पराभवानंतरही मेरीने विश्व चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा आणखी एक विक्रम केला. विश्व चॅम्पियनशिपमधील मेरी कोमचे हे आठवे आणि ५१ किलोगटात पहिले पदक ठरले. मेरी कोमचे ट्रेनर छोटेलाल यादव हे देखील या निर्णयावर नाराज होते. (वृत्तसंस्था)
मंजुराणी फायनलमध्ये
जागतिक स्पर्धेत प्रथमच खेळणारी भारतीय खेळाडू मंजुराणी हिने शनिवारी शानदार कामगिरीच्या बळावर ४८ किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली. सहावे मानांकन लाभलेल्या मंजुराणीने उपांत्य फेरीच्या लढतीत थायलंडची प्रतिस्पर्धी चुटहामत रखसत हिच्यावर ४-१ ने मात केली. आता सुवर्णपदकासाठी मंजुराणीला आज, रविवारी दुसरी मानांकित रशियाची एकेतरिना पाल्टसेवा हिच्याविरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांत मंजूने केवळ हल्ल्यास प्रत्युत्तर दिले. अखेरच्या तीन मिनिटांत सामना फिरविणारी कामगिरी केली.
‘का आणि कसा निर्णय..., हा निर्णय किती चुकीचा होता, हे जगाला कळायला हवे. या निर्णयावर मी स्तब्ध आहे. माझा खेळ जिंकण्याइतका भक्कम होता. मला जिंकायलाच हवे होते.’
- मेरी कोम