बुमराहचा नो-बॉल भारताला पडला तब्बल 111 धावांना
By admin | Published: June 18, 2017 09:19 PM2017-06-18T21:19:57+5:302017-06-18T22:06:50+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. 339 धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. अवघ्या 158 धावांमध्ये भारताच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. या महामुकाबल्यामध्ये पाकिस्तानचा नवखा सलामीवीर फखर जमान याने शानदार शतक झळकावलं. अवघ्या 106 चेंडूंमध्ये 114 धावा करत त्याने भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर पाकिस्तानने भारताला 339 धावांचं आव्हान दिलं.
मात्र, या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहची एक चूकीमुळे भारताला तब्बल 111 धावा मोजायला लागल्या. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या सुरूवातीला भारताकडून जसप्रित बुमराहने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला होता. बुमराहच्या या ओव्हरमध्ये फखर जमान हा धोनीकडे झेल देऊन बाद झाला होता. त्यावेळी तो केवळ 3 धावांवर खेळत होता. पण त्याला नशिबाची साथ मिळाली कारण बुमराहचा हा बॉल रिप्ले बघितल्यानंतर नो-बॉल देण्यात आला. त्यानंतरही फखर जमानला धावचीत करण्याची संधी भारतीय क्षेत्ररक्षकांना होती पण भारताचं क्षेत्ररक्षण लौकिकास साजेसं झालं नाही. त्यानंतर फखर जमानने 114 धावांची शानदार खेळी करत भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. या शानदार खेळीदरम्यान फखर जमानला नशिबाची जोरदार साथ मिळाली.