बुमराहची कामगिरी प्रशंसनीय : बाँड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2016 03:37 AM2016-04-10T03:37:44+5:302016-04-10T03:37:44+5:30
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर स्तुतिसुमनांची उधळण
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर स्तुतिसुमनांची उधळण केली आहे. जसप्रीत बुमराह याची ट्वेंटी-२0 मधील कामगिरीची प्रशंसा व्हायला हवी, असे त्याने सांगितले.
बाँड म्हणाला, ‘बुमराह गेल्या वर्षी गुडघेदुखीनंतर सामना खेळण्यास आला होता. त्यामुळे तो त्याची सर्वोत्तम कामगिरी करू शकला नव्हता; परंतु गतवर्षी त्याच्यात झालेल्या बदलासाठी त्याच्या मेहनतीला श्रेय मिळायला हवे. तो असा खेळाडू आहे की, जो नेहमीच पुढे जात आहे. त्याने ज्याप्रमाणे ट्वेंटी-२0 मध्ये भारतासाठी गोलंदाजी केली ती सर्वोत्तम आहे.’
बाँडने खेळाच्या बदलत्या स्वरूपातील फलंदाजीविषयी म्हटले, खेळात आता खूप टेक्निक आले आहे व विशेषत: खेळाच्या विश्लेषणात. त्यामुळे फलंदाज सामन्यात कोठे आणि केव्हा प्रहार करील, तसेच कोणत्या फलंदाजाविरुद्ध तुम्ही कोणत्या गोलंदाजाचा उपयोग होईल याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तसेच अनेक बाबी आहेत ज्या जिंकण्याची संधी मिळवून देतात. शेवटी गोलंदाजाला दबावाच्या स्थितीतून जावे लागते आणि योग्य ठिकाणी गोलंदाजी करावी लागते.
बुमराह ज्या आत्मविश्वासाबरोबरच फॉर्ममध्ये आहे, त्याने संघाला मजबुती मिळेल. मुंबईचा हा वेगवान गोलंदाज मलिंगाची उणीव भासू देणार नाही. कारण संघाजवळ अनेक पर्यायही उपलब्ध आहेत, असे बाँडने सांगितले.