बट, आसिफ, आमीरच्या पुनरागमनास विरोध
By Admin | Published: August 20, 2015 11:34 PM2015-08-20T23:34:01+5:302015-08-20T23:34:01+5:30
स्पॉट फिक्सिंगमधील दोषी सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमीर या पाक क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळात परतण्याची मुभा दिली असली,
कराची : स्पॉट फिक्सिंगमधील दोषी सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमीर या पाक क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळात परतण्याची मुभा दिली असली, तरी पाक क्रिकेटविश्वात त्यांना कडाडून विरोध होत आहे. या तिघांना राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान नकोच, अशी भूमिका अनेक माजी खेळाडूंनी घेतली आहे.
माजी कर्णधार रशिद लतिफ म्हणाला, ‘मी या तिन्ही खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान देण्याच्या विरोधात आहे. तिघांमुळे प्रतिभावान खेळाडूंच्या यशाचा मार्ग अडविला जाऊ शकतो. सभ्य आणि प्रामाणिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसोबत अन्याय होऊ नये.’ पाकचा माजी सलामीवीर आणि माजी मुख्य निवडकर्ता तसेच कोच मोहसिन खान हादेखील या तिघांच्या पुनरागमनाविरोधात आहे. तो म्हणतो, ‘तिघांनी याबद्दल शिक्षा भोगली असेल; पण त्यांनी मॅचफिक्सिंगसारखा मोठा अपराध केला असून, असा गुन्हा केला असेल तर दुसरी संधी नकोच!’ माजी सलामीवीर बाजिद खान म्हणाला, ‘तिन्ही खेळाडूंनी क्रिकेटला व देशाला धोका दिला आहे.
या तिघांची शिक्षा पूर्ण झाली
तरी इतरांना संदेश देण्यासाठी या तिघांना संघात स्थान देऊ नये. पाकचा माजी कर्णधार आणि समालोचक रमीझ राजा म्हणाला, ‘या तिन्ही खेळाडूंना पाकच्या ड्रेसिंग रूममध्ये पुन्हा प्रवेश देऊ नका.’
माजी कर्णधार आणि सिनियर मॅनेजर मोहम्मद युसूफ याने मात्र बट आणि आमीर यांना पुन्हा संधी देण्याचा युक्तिवाद केला. आपल्या वक्तव्यावर तो म्हणाला, ‘माझ्या मते स्थानिक सामन्यात या खेळाडूंची कामगिरी चांगली राहिल्यास त्यांना राष्ट्रीय संघात प्रवेश द्यावा. मिस्बाह उल हक किंवा अझहर अली यांना या खेळाडूंसोबत खेळण्यास कुठला अडसर असावा असे मला वाटत नाही.’ (वृत्तसंस्था)