बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्स; सिंधू, श्रीकांत समीकरण बदलण्यास प्रयत्नशील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:00 AM2021-01-27T00:00:08+5:302021-01-27T00:00:40+5:30
पुरुष एकेरीत श्रीकांतने पहिल्या फेरीतील प्रतिस्पर्धी एंडरसनला २०१७ मध्ये पराभूत केले होते
बँकॉक : भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व किदाम्बी श्रीकांत गेल्या दोन आठवड्यांतील निराशा विसरून बुधवारपासून येथे होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्समध्ये नव्याने सुरुवात करतील. विश्व चॅम्पियन व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सिंधूला चिनी ताइपेची ताई जू यिंग व थायलंडच्या रतचानोक इंतानोन व पोर्नपावी चोचुवोंग यांच्या गटात स्थान मिळाले आहे.
सिंधू कोरोना व्हायरसमुळे प्रदीर्घ काळ विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये अपेक्षित सुरुवात करू शकली नाही. ती आशियाई टप्प्यातील पहिल्या स्पर्धेत थायलंड ओपनमध्ये फेरीत पराभूत झाली होती. गेल्या आठवड्यात दुसऱ्या स्पर्धेत तिला उपांत्यापूर्व फेरीत माजी विश्व चॅम्पियन रतचानोकविरुद्ध सरळ गेम्समध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आता तिला हे अपयश विसरून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. तिला पहिल्या फेरीत ताई ज्यू यिंगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. यिंगने थायलंड ओपनच्या दोन्ही स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती.
जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू पुरुष विभागात डेन्मार्कच्या एंडर्स एंटोनसेन, चिनी ताइपेच्या वांग ज्यु वेई व हाँगकाँगच्या एनजी का लोंग यांच्यासह ‘ब’ गटात आले. श्रीकांतने अलीकडच्या कालावधीत कोर्टवर अधिक वेळ घालविलेला नाही. त्याने थायलंड ओपनच्या पहिल्या स्पर्धेत स्नायूच्या दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीतून माघार घेतली होती तर रूममध्ये त्याच्यासोबत असलेला बी. साईप्रणीत कोविड-१९ चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.भारताच्या दोन्ही खेळाडूंच्या अलीकडच्या कालावधीतील कामगिरी व त्यांचा रेकॉर्ड बघता आव्हान सोपे नाही.सिंधूचा ताई ज्यू यिंगविरुद्ध ५-१५ असा निराशाजनक रेकॉर्ड आहे तर रतचानोकने या भारतीय खेळाडूविरुद्ध गेल्या आठवड्यात उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत आपला रेकॉर्ड ५-४ असा केला. पोर्नपावीविरुद्ध सिंधूची कामगिरी ३-१ अशी चांगली आहे.
पुरुष एकेरीत श्रीकांतने पहिल्या फेरीतील प्रतिस्पर्धी एंडरसनला २०१७ मध्ये पराभूत केले होते, पण डेन्मार्कच्या खेळाडूने त्यानंतर बरीच सुधारणा केली असून तो जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. श्रीकांतचा पुढील सामना वांगविरुद्ध होणार आहे. त्याच्याविरुद्ध त्याचा रेकॉर्ड ३-० असा आहे तर एंगसीविरुद्धची कामगिरी २-२ अशी बरोबरीत आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.