अभिमानास्पद! भवानी देवीने रचला इतिहास; आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:53 PM2023-06-20T12:53:56+5:302023-06-20T12:54:03+5:30
Asian Fencing Championships : भवानी या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरली आहे.
नवी दिल्ली : ऑलिम्पियन तलवारबाज सीए भवानी देवीने आशियाई अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले. विशेष बाब म्हणजे भवानी या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरली. चीनच्या वुक्सी प्रांतात रंगलेल्या या स्पर्धेच्या सायबर प्रकारात उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या झेनाब डेयिबेकोवा हिने भवानीला १५-१४ असे नमवले. या पराभवासह भवानीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी भवानीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत गत विश्वविजेती जपानची मिसाकी एमुराचा पराभव करत ऐतिहासिक पदक निश्चित केले होते.
भवानीला राउंड ऑफ ६४ फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यानंतर पुढील फेरीत तिने कझाखस्तानची डोस्पे करिनाचा पराभव केला. उप-उपांत्यपूर्व लढतीत तिने तिसरी मानांकित ओजाकी सेरी हिचा १५-११ असा पराभव केला होता. उपांत्य फेरीत अटीतटीच्या लढतीत एका गुणाने भवानी माघारल्यामुळे तिच्या कामगिरीत झपाट्याने सुधारणा घडून येत असल्याचे मानले जात आहे. भवानी देवीच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भवानीच्या यशाचे कौतुक केले.
भवानी देवीचे सर्वत्र कौतुक
"अभिमानास्पद कामगिरी! २७ ऑगस्ट १९९३ला चेन्नई येथे जन्मलेली भवानी २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली होती. आठवेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेली भवानी देवी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा पहिला सामना जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली", असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले.
अभिमानास्पद कामगिरी!
— Supriya Sule (@supriya_sule) June 20, 2023
भारताची तलवारबाज भवानी देवी हिने आशियाई तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भवानी देवी हिने या खेळातील विद्यमान जागतिक विजेतीला पराभूत केले. या खेळातील हे भारताचे पहिलेच पदक आहे. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.… pic.twitter.com/wT9jjUcqRU