सीएसीचा दावा बिनबुडाचा : बीसीसीआय
By admin | Published: June 12, 2017 12:58 AM2017-06-12T00:58:24+5:302017-06-12T00:58:24+5:30
क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी योग्य मानधन मागत असल्याचे मीडियातील वृत्त बिनबुडाचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
नवी दिल्ली : क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी योग्य मानधन मागत असल्याचे मीडियातील वृत्त बिनबुडाचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
सीएसीमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी सीएसी मानधनाची मागणी करीत असल्याचा दावा मीडियातील एका गटाने केला आहे.
क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सांगितले की, ‘वृत्तपत्रातील वृत्त बिनबुडाचे आहे. सीएसीने कुठलीच मागणी केलेली नाही. मीडियातील वृत्ताला कुठलाही आधार नाही.’
तिन्ही माजी क्रिकेटपटूंनी जोहरी यांना सांगितले की, ते आपली सेवा नि:शुल्क देण्यास असमर्थ आहेत, असा दावा या वृत्तात करण्यात आलेला आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘या वृत्ताचा विषय निराशाजनक आहे. भारतीय क्रिकेटच्या या महान खेळाडूंचे योगदान चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा हा प्रयत्न निराधार आहे. सीएसीच्या शिफारशी व मार्गदर्शन भारतीय क्रिकेटच्या प्रगतीसाठी अमूल्य आहे. आम्ही हा लेख रद्द करावा, अशी विनंती करीत आहोत.’