भक्ती कुलकर्णीला भारतीय संघासाठी ‘कॉल’!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:10 AM2019-03-05T04:10:08+5:302019-03-05T04:10:52+5:30
गोव्याची महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी अस्ताना (कझाकस्तान) येथे होणाऱ्या विश्व सांघिक अजिंक्यपदमध्ये पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधीत्व करेल.
सचिन कोरडे
पणजी : गोव्याची महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी अस्ताना (कझाकस्तान) येथे होणाऱ्या विश्व सांघिक अजिंक्यपदमध्ये पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधीत्व करेल. या स्पर्धेसाठी भारताला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे. संघात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय मास्टर इशा करवडे हिचाही समावेश आहे.
अचानक आलेल्या ‘कॉल’ने भक्तीलाही आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव भारत सिंग चौहान यांनी भक्तीला तिच्या निवडीबद्दल फोनवरून कळवले. अचानक फोन आल्याने भक्तीची धांदल उडाली. ‘देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणे हे खूप अभिमानास्पदआहे. आघाडीच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघात स्थान मिळणे महत्त्वपूर्ण आहे,’ अशी प्रतिक्रीया तिने व्यक्त केली. ती पुढे म्हणाली की, ‘ही मोठी संधी आहे. चीन, रशिया, अमेरिकासारख्या देशाविरुद्ध स्वप्नवत आहे.’
विश्व सांघिक अजिंक्यपदमध्ये दहा देश एकमेकांविरुद्ध खेळतील. यात आॅलिम्पियाड पदकविजेत्यांचा समावेश आहे. आॅलिम्पियाडमध्ये चीनचे वर्चस्व असून त्यांनी यामध्येसुवर्णपदक मिळवले आहे.
>चायना ओपनची विजेती
गोव्याच्या भक्ती कुलकर्णी हिने गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या चायना ओपन आणि महिला गटातील विजेतेपद पटकाविले होते. या कामगिरीनंतर भक्तीने फिडेचे लक्ष्य आपल्याकडे वेधले होते. भक्ती ही राष्ट्रीय विजेती सुद्धा आहे. अशी कामगिरी करणारी ती एकमेव गोमंतकीय महिला बुद्धिबळपटू आहे.