VIDEO: भारतात फुटबॉल क्रिकेटची बरोबरी करू शकेल का? सुनील छेत्रीच्या उत्तरानं जिंकली मनं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 05:45 PM2022-11-21T17:45:46+5:302022-11-21T17:46:56+5:30
भारतात क्रिकेटप्रेमींच्या संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
नवी दिल्ली : भारतात क्रिकेटप्रेमींची संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मात्र जगातील सर्वात प्रसिद्ध असलेला फुटबॉलचा खेळ भारतात तितकासा प्रसिद्ध नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या फिफा विश्वचषकाने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. मात्र या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची भारताला संधी देखील मिळाली नाही. अशातच भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीची एक मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे.
सुनिल छेत्रीने भारतीय फुटबॉलच्या भविष्याबाबत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या मुलाखतीमध्ये पत्रकार सुनील छेत्रीला विचारतो की, फुटबॉलने मागील अनेक वर्षात चांगली प्रगती केली आहे. मग तुला काय वाटते भारतात फुटबॉल कधी क्रिकेटची बरोबरी करू शकेल का? पत्रकाराच्या प्रश्नाला भारतीय कर्णधाराने देखील शानदार उत्तर दिले.
आपण विश्वविजेते आहोत - छेत्री
सुनिल छेत्रीने दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत. छेत्री उत्तर देताना म्हणतो, "'सर सर्वप्रथम मला खूप आनंद होतो की आपल्या देशात क्रिकेट खूप चांगले चालले आहे, जेव्हा धोनी आणि विराट स्पर्धा आणि सामने जिंकतात तेव्हा मला खूप आनंद होतो. मुद्दा असा नाही की आपल्याला क्रिकेटशी स्पर्धा करायची आहे. मुद्दा असा आहे की आपण प्रत्येक सामन्यात चांगले असले पाहिजे. क्रिकेटने नाव कमवावे आणि क्रिकेट खूप मोठे व्हावे असे मला वाटते. जेव्हा कोणी मला बोलते की क्रिकेटमध्ये आपण विश्वविजेते आहोत, तेव्हा मला खूप आनंद होतो."
जितके मोठे क्रिकेट असेल तितके ते आपल्यासाठी चांगले
पुढे बोलताना छेत्री म्हणतो, "जेव्हा मी भारताची जर्सी घालतो आणि आम्ही स्पर्धा जिंकतो तेव्हा मला खूप आनंद होतो. सायना नेहवाल स्पर्धा जिंकते तेव्हा मला आनंद होतो. तर याचा अर्थ असा नाही की कोणी चांगले करत आहे आणि दुसरा खाली येत आहे आणि आपण वर जात आहे. याचा काहीच फायदा नाही कारण तो खेळाडू इतर कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसून आपल्या देशासाठी खेळत आहे. त्यामुळे जितके मोठे क्रिकेट असेल तितके ते आपल्यासाठी चांगले आहे. पण आपण 1.3 अब्ज लोकसंख्येचा देश असल्यामुळे इतर खेळांमध्येही चांगली कामगिरी करू शकतो असे मला वाटते. भारतीय कर्णधाराचा हा व्हिडीओ जवळपास 6 वर्षे जुना आहे, मात्र फिफा विश्वचषकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"