कॅनडा ओपन बॅडमिंटन ; साईप्रणीत अंतिम फेरीत
By admin | Published: July 3, 2016 07:13 PM2016-07-03T19:13:10+5:302016-07-03T19:13:10+5:30
भारताच्या के. पी. साईप्रणीत पुरुष एकेरीत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेरडेजचा पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
ऑनलाइन लोकमत
कॅलगरी, दि. ३ : जागतिक क्रमवारीत ३७ व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या के. पी. साईप्रणीत पुरुष एकेरीत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेरडेजचा पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत चौथे मानांकन असलेल्या प्रणीतने फ्रान्सचा सातवा मानांकित ब्राइस लेव्हेरडेजला एक तास आठ मिनिटे चाललेल्या उपांत्य लढतीत २२-२०, १९-२१, २१-१२ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. प्रणीतने यापूर्वी २०१२ मध्ये थायलंड ओपनमध्ये लेव्हेरडेजला पराभूत केले आहे. विजेतेपद जिंकण्यासाठी प्रणीतला आता कोरियाचा तिसरा मानांकित ली हुनविरुद्ध खेळावे लागणार आहे. हुनने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित जयरामला सरळ दोन गेममध्ये २८ मिनिटांत २१-९, २१-८ गुणांनी पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ४४ व्या क्रमांकावर असलेल्या कोरियाच्या खेळाडूविरुद्ध खेळताना सतर्क राहावे लागणार आहे. गतवर्षी मलेशिया येथे झालेल्या मास्टर्स स्पर्धेत लीने प्रणीतला पराभूत केले होते.
पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधीत्व अव्वल मानांकित मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी ही जोडी करणार आहे. त्यांची लढत कॅनडाचा अॅड्रियन लू आणि टोबी एनजी या बिगरमानांकित जोडीविरुद्ध होईल. अंतिम चारच्या लढतीत मनू आणि सुमित जोडीने इंडोनेशियाच्या आंद्रेई आदिस्तिया आणि कॅनडाचा डोंग एडम जोडीला ३१ मिनिटांत २१-१५, २१-१९ गुणांनी पराभूत केले. या भारतीय जोडीला पुढे चाल मिळाल्यामुळे त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.